प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेची स्थिती सुधारण्यासाठी सर्व विभागांनी तातडीने कर वसुली वाढवावी. मार्च 2021 अखेर वसुलीचे नियोजन आणि अंमलबजावणी आतापासूनच करण्यात यावी, अशा सूचना आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी आढावा बैठकीत केल्या.
महापालिकेच्या विविध विभागांचा वसुलीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली वसुली विभागाच्या अधिकाऱयांची बैठक आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, जल अभियंता भास्कर कुंभार, कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, इस्टेट सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, अग्निशमन अधिकारी रणजीत चिले आदी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. बलकवडे यांनी या बैठकीत घरफाळा, पाणीपट्टी, नगररचना, इस्टेट, परवाना, अग्निशमन आदी विभागांच्या कर वसुलीची माहिती घेऊन सूचना केल्या. कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थीती अडचणीची बनल्याने कर वसुलीशिवाय पर्याय नाही. सर्व विभागांनी आतापासून नियोजन करून वसुली करावी. यापुढे दर आठवडयास वसुली बाबतच्या आढावा घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
थकीत पाणीपट्टी दोन टप्प्यात वसूल करा
पाणीपुरवठा विभागाने नोटिशीची मुदत संपलेल्या ग्राहकांकडून थकबाकी वसूल करावी. ज्यांच्याकडून वसुली शक्य आहे, पहिल्या टप्प्यात प्राधान्य द्या. दुसऱया टप्प्यात ज्यांच्या अडचणीत आहेत. त्यांच्याकडून वसुली करा, अशा सूचना आयुक्त डॉ. बलकवडे यांनी जल अभियंता भास्कर कुंभार यांना केल्या.
थकीत घरफाळा भरणाऱयांना सन्मानपत्र
घरफाळÎाची मोठी थकबाकी भरणाऱया मिळकतधारकांना सन्मानपत्र देण्याची योजना सुरू करा. घरफाळा रक्कम भरणाऱयांचा सत्कार करा आणि घरफाळा थकबाकीदारांवर कारवाई करा, असे आयुक्त डॉ. बलकवडे यांनी सांगितले.
विभाग प्रमुखांनी दिलेली माहिती अशी ः
-अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई ः स्थानिक संस्था कराची (एलबीटी) अंमलबजावणी 2015-2016 मध्ये बंद केली आहे. त्यापूर्वीचा कर सीएमार्फत तपासून आकारण्यात येत आहे.
एलबीटी अधिकारी विलास साळोखे ः अभय योजनेत सहभाग नसलेल्या व्यापाऱयांचा कॅम्प लावून एलबीटीपोटी 5 कोटीच्या वसुलीचे नियोजन आहे.
सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर ः विभागीय कार्यालयानुसार घरफाळा विभागाचा आढावा सुरू आहे. थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा केला जात आहे.
कर निर्धारक संजय भोसले ः घरफाळा विभागाकडून 29कोटी 73 लाखांची वसुली. 26000 मिळकतदारांना नोटीसा. 5 लाख व त्यावरील थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना नोटीस काढण्याचे नियोजन केले आहे. 15000 मिळकतधारकांनी ऑनलाईन घरफाळा भरला आहे.
जलअभियंता भास्कर कुंभार ः पाणीपट्टी वसुलीसाठी 5 पथके स्थापन, वसुली सुरू आहे. थकबाकीदार नागरिकांसह शासकीय कार्यालयांनाही थकबाकी वसुलीसाठी नोटीस देण्यात आल्या आहेत. पाणी पुरवठा विभागास 55 कोटी वसुलीचे उद्दीष्ट आहे.