घरफाळा, पाणीपट्टीसह इतर कर भरण्याचे नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
आर्थिक वर्षातील शेवटचा दिवस असणार्या बुधवारी अर्थात 31 मार्च रोजी नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे रात्री 12 पर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. शहरातील नागरीकांनी या सुविधेचा लाभ घेवून आपला घरफाळा, पाणी बिल, परवाना शुल्क, इस्टेट भाडे, होर्डिंग जाहिरात शुल्क इत्यादी रक्कम भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या महसुली विभागाकडील घरफाळा, पाणीपट्टी, इस्टेट, परवाना व अन्य वसुलीचे अनुषंगाने 31 मार्चचा दिवस आर्थिक वर्षातील अखेरचा दिवस असल्याने सीएफसी केंद्रे सर्व कर स्वीकारण्यासाठी सुरु ठेवण्यात आली आहेत. महापालिकेने 1 हजार स्केअर फूटाच्या आतील मिळकत धारकांना दंडच्या व्याजामध्ये 16 ते 31 मार्चपर्यंत संपूर्ण घरफाळा भरल्यास 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. तर 1 हजार स्केअर फूटाच्या वरील मिळकतधारकांना दंडाच्या व्याजामध्ये 16 ते 31 मार्चपर्यंत घरफाळा भरल्यास 30 टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याप्रमाणे 1000 चौ. स्क्वे. फुट पर्यंतच्या अनिवासी वापरातील मिळकतींना 1 मार्च ते 31 मार्च अखेर दंड व्याजात 40 टक्के सवलत दिली जाणार आहे. 1000 चौ. स्क्वे. फुटावरील अनिवासी वापरातील मिळकतींना 31 मार्च अखेर घरफाळा भरल्यास दंड व्याजात 30 टक्के सवलत दिली जाणार आहे.
घरफाळा थकविल्यास प्रॉपर्टी कार्डवर बोजा
घरफाळा सवलत योजनेचा बुधवार 31 मार्च हा शेवटचा दिवस आहे. या मुदत संपण्याआधी थकबाकी धारकांनी सवलत योजनेचा लाभ घ्यावा, अन्यथा 1 एप्रिल नंतर घरफाळा थकविणार्या मिळकतधारकांच्या प्रॉपर्टीकार्डात थकीत घरफाळा रक्कमेचा बोजा नोंद करण्यात येणार असल्याचे घरफाळा विभागाने स्पष्ट केले आहे.