वार्ताहर / अब्दुल लाट
अब्दुललाट च्या महापुरातील नुकसानग्रस्तांच्या तसेच ग्रामस्थांच्या विविध न्याय मागण्यासाठी शेतकरी विकास समितीच्यावतीने सोमवार दि.२२ जुन रोजी येथील गावचावडीसमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची घोषणा समितीचे सचिव कॉ.आप्पा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यावेळी सुरेश शेडबाळे, सुभाष परीट, देवेंद्र कांबळे, मोहन कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
गेल्या महापूरात येथील पुरग्रस्तांचे व शेतक-यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. शासनाकडून मदतनिधीही प्राप्त झाला. पण हा मदतनिधी सर्वच पात्र लाभार्थ्यांना न मिळता कमिशन मिळवण्यासाठी काही पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी जवळच्या बोगस लाभार्थ्यांना भरमसाठ निधी मिळवून दिला. अशी अनेक ग्रामस्थांची तक्रार आहे. याबाबत सोशल मिडिया व प्रत्यक्ष तहसिलदारांकडेही अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. पण या प्रकरणात वरिष्ठ स्तरावरून फारशी गांभीर्याने कार्यवाही दिसत नसल्याने अनेकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकरी विकास समिती या प्रकरणाचा पर्दापाश करणार असल्याचे कॉ.आप्पा पाटील यांनी सांगितले. जोपर्यंत स्वतंत्रपणे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व सर्व्हे केला जाऊन पात्र पुरग्रस्तांना व शेतक-यांना योग्य नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. आंदोलनाचा पहिला टप्पा सोमवार दि.२२ जुन रोजी गावचावडीसमोर ठिय्या आंदोलनाचा असुन जोपर्यंत अब्दुललाट पुरग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी सखोल.चैाकशी होऊन योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन होणारच. शिरोळ तहसीलदारांना याबाबत देण्यात येणाऱ्या निवेदनातील मागण्या अशा –
१ महापूरावळी शेती क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होऊन अजून अनेकांना मदत मिळाली नाही त्यांना तत्काळ मदत मिळावी
२ महापुरा मध्ये अनेक कुटुंबे विस्थापित झाली त्यापैकी काही लोकांना 6 महिन्याचे घरभाडे 24000/- देण्यात आले आहे. मात्र अद्यापि अनेक विस्थापित कुटुंबांना कुटुंबांना घरभाडे मिळाले नाही. ते तात्काळ मिळावे.
३ महापुर काळात शासनाची फसवणूक करून आंदोलन अनुदान लाटलेण्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी.
दरम्यान आज रोजी ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी यांना अशा पद्धतीचे निवेदन देण्यात आले आहे व गावातील सर्वच सामाजिक कार्यकर्ते जे आंदोलन करत आहेत त्यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.कॉ. आप्पा पाटील. सुरेश शेडबाळे, सुभाष परीट. देवेंद्र कांबळे, मोहन कांबळे आदिंसह अनेक ग्रामस्थांच्या उपस्थित होते.