वार्ताहर/ एकसंबा
पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे चिकोडी, हुक्केरी व निपाणी तालुक्यातील वेदगंगा, दूधगंगा, कृष्णा, हिरण्यकेशी व घटप्रभा आदी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाप्रमाणे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीकाठी शेतात राहणारे नागरिक स्वत:हून सुरक्षितस्थळी राहण्यास जात असल्याचे दिसून येत आहे. वाढती पाणीपातळी लक्षात घेता नद्यांची वाटचाल धोका पातळीकडे होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत 2 मीटरने तर दूधगंगेच्या पाणीपातळीत एका मीटरने वाढ झाली आहे. धोका पातळी ओलांडण्यासाठी कृष्णेची पाणीपातळी 3.89 मीटरने कमी असून दूधगंगेची पाणीपातळी 1.6 मीटरने कमी आहे. रोज कृष्णेची दोन ते तीन मीटरने पाणीपातळी वाढत आहे. तर दूधगंगेतही एक व दोन मीटरने पाणीपातळी वाढत आहे. यामुळे पाण्याचा वाढता आलेख असाच कायम राहिल्यास या दोन्हीही नद्या धोकापातळी ओलांडण्याची शक्यता आहे.
पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. कोयना धरणात 20461 क्युसेकने आवक होत आहे. अद्यापही विसर्ग करण्यात येत नसून वारणा धरणातून 4400 क्युसेक, राधानगरी धरणातून 7112 क्युसेक तर काळम्मावाडी धरणातून 1000 क्युसेकने विसर्ग केला जात आहे. राजापूर बंधाऱयातून 1 लाख 23 हजार क्युसेक, दूधगंगेतून 33 हजार क्युसेक असे एकूण कृष्णेच्या पात्रात 1 लाख 56 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कृष्णेची धोकापातळी 537 मीटर असून शुक्रवारची पातळी 533.11 मीटर होती. दूधगंगेची धोकापातळी 538 मीटर असून शुक्रवारची पाणीपातळी 536.400 मीटर होती.
कोयना, वारणा, राधानगरी, नवजा, काळम्मावाडी, पाटगाव, महाबळेश्वर या पाणलोट क्षेत्रात 88 ते 290 मि. मी. पाऊस झाला आहे. तर तालुक्यात विविध पर्जन्यमापन केंद्रावर 3.2 ते 11.6 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर चिकोडी तालुका प्रशासनाने नोडल अधिकाऱयांच्या सहाय्याने नदीकाठची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी 21 जणांच्या टीमद्वारे नियोजन करण्यात आले आहे. जर गतवर्षाची परिस्थिती उद्भवल्यास अंकली येथील निवारा केंद्रात नागरिकांची सोय करण्याचे आदेश दिले आहेत.
तहसीलदार, प्रांताधिकाऱयांची नाईट डय़ुटी
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत होत असलेली वाढ लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुरुवारी जिल्हाधिकाऱयांनी वेदगंगा व कृष्णा काठी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णवर व तहसीलदार सुभाष संपगावी यांनी गुरुवारी रात्री येडूर येथे जाऊन एनडीआरएफ जवान व स्थानिक अधिकारी व कर्मचाऱयांशी वाढत्या पाणीपातळीविषयी चर्चा केली. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी अधिकाऱयांना नाईट डय़ुटीही करावी लागत असल्याचे त्यांच्या भेटीवरुन दिसून आले.
या गावांना सतर्कतेच्या सूचना
चिकोडी व निपाणी तालुक्यामधून पाच नद्या वाहतात. यामध्ये कृष्णा काठावरील कल्लोळ, येडूर, येडूरवाडी, चंदूर, मांजरी, अंकली, इंगळी. दूधगंगा काठावरील कोगनोळी, मांगूर, कारदगा, मलिकवाड, शिरदवाड, जनवाड, सदलगा, एकसंबा, बेडकिहाळ, शमनेवाडी, बोरगाव. वेदगंगा काठावरील यमगर्णी, जत्राट, सिदनाळ, ममदापूर, हुन्नरगी, भोज, कुर्ली, भाटनांगनूर, सौंदलगा, आडी, कुन्नूर, अकोळ, नांगनूर. पंचगंगा काठावरील माणकापूर तर चिकोत्रा नदी काठावरील कोडणी व बुदिहाळ या गावातील नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.