प्रतिनिधी/कोल्हापूर
महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा दिला. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झालेल्या विशेष सभेत अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे त्यांनी राजीनाम्याचे पत्र सुपूर्द केले. कोल्हापूरचे भाग्यविधाते, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे लोकार्पण आपल्या कार्यकाळामध्ये होण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे महापौरपदाचा कार्यकाळ जीवनातील अविस्मरणीय क्षण असल्याची भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
सत्ता वाटपानुसार राष्ट्रवादीच्या वाटय़ाला असलेल्या महापौर पदाचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2019 रोजी संपला होता. मात्र याकाळात नेतेमंडळी राज्यात सत्तास्थापनेत व्यस्त होते. त्यामुळे महापौर ऍड. लाटकर यांचा राजीनामा लांबणीवर पडला. त्यांना 19 जानेवारीपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली. महापौर ऍड. लाटकर यांनी 19 नोव्हेंबर 2019 रोजी महापौर पदाची सुत्रे हाती घेतली. त्यांनी शहरातील वाहतूक कोंडीप्रश्नाचा पाठपुरावा केला. तसेच प्रलंबित, रखडलेल्या योजनांनाही गती देण्याचा प्रयत्न केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधी स्मारक स्थळाचा लोकार्पण सोहळा यशस्वी केला.
काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये रस्सीखेच
ऑक्टोबर 2020मध्ये महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुढील आठ महिन्यांसाठी महापौरपद काँग्रेसकडे असणार आहे. महापौरपदासाठी नगरसेविका उमा बनछोडे, जयश्री चव्हाण, इंदुमती माने, दीपा मगदूम, निलोफर आजरेकर इच्छुक आहेत. इच्छुक पाच नगरसेविकांपैकी दोन नगरसेविकांना चार-चार महिने महापौर पद भूषविण्याची संधी मिळणार आहे. महापौरपदी कोणाची वर्णी लागणार यासह पालकमंत्री सतेज पाटील कोणाला संधी देणार याकडे संपूर्ण महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.