नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथविधी रखडला
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणूक होऊन दोन महिने होत आले. पण अद्याप महापौर-उपमहापौर निवडणूक झाली नाही. महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या आरक्षणाचा घोळ निर्माण झाल्याने याबाबत नगरविकास खात्याकडे स्पष्टीकरण विचारण्यात आले आहे. मात्र याबाबत कोणतेच स्पष्टीकरण आले नसल्याने महापौर-उपमहापौर निवड प्रलंबित आहे.
महापालिका सभागृहाची मुदत फेब्रुवारी 2019 मध्ये संपुष्टात आली होती. निवडणूक लांबणीवर पडल्याने मनपावर प्रशासकीय राजवट होती. सभागृह अस्तित्वात नव्हते. तरी महापौर-उपमहापौर निवडीचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. 21 व्या कार्य कालावधीच्या महापौर-उपमहापौर निवडीसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये आरक्षण जाहीर झाले होते. तसेच 22 व्या कार्य कालावधीकरिता 2020 आणि दि. 23 व्या कार्य कालावधीकरिता फेब्रुवारी 2021 मध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणूक कोणत्या आरक्षणानुसार घ्यायची, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत स्पष्टीकरण विचारण्यासाठी नगरविकास खात्याला पत्र पाठविण्यात आले आहे. पण आरक्षणाबाबत कोणतेच स्पष्टीकरण अद्याप आले नाही.
बेळगावसह हुबळी-धारवाड आणि गुलबर्गा महापालिकेनेदेखील आरक्षणाबाबत स्पष्टीकरण विचारले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पण अद्याप कोणत्याच महापालिकेला याचे स्पष्टीकरण मिळाले नाही. दि. 30 रोजी पोटनिवडणूक असल्याने पोटनिवडणूक झाल्यानंतरच याबाबत स्पष्टीकरण मिळले, अशी माहिती महापालिकेतून उपलब्ध झाली आहे. दिवाळीनंतरच आरक्षणाबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्मयता आहे. आरक्षणाबाबत स्पष्टीकरण उपलब्ध झाल्यानंतरच महापौर-उपमहापौर निवडणूक होणार आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीवेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथविधी होणार आहे. पण शपथविधी होण्यापूर्वी कार्यभार हाती घेऊन नगरसेवकांनी कामकाजास प्रारंभ केला आहे.