महानगरपालिकेकडून प्रादेशिक आयुक्तांकडे माहिती सादर
प्रतिनिधी /बेळगाव
महापौर-उपमहापौर आरक्षणाबाबत स्पष्टीकरण मिळाल्यानंतर निवडणूक घेण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सोमवारी प्रादेशिक आयुक्तांना देण्यात आला. त्यामुळे आता महापौर-उपमहापौर निवडीच्या तारखेकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणूक होऊन चार महिने उलटले मात्र अद्यापही सभागृह अस्तित्वात आले नाही. महापौर-उपमहापौर आरक्षणाच्या मुद्दय़ामुळे निवडणूक रखडली होती. नगरविकास खात्याने अलिकडेच आरक्षणाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 21 व्या कार्य कालावधीसाठी 2018 मध्ये जाहीर केलेल्या आरक्षणानुसार महापौरपद सामान्य महिलांसाठी आणि उपमहापौरपद मागास- ब महिलेसाठी राखीव आहे. यानुसारच महापौर-उपमहापौर निवड करण्याची सूचना केली आहे. स्पष्टीकरणाचे अधिकृत पत्र मनपाला मिळाले नसल्याने पुढील कामकाज रखडले होते. तसेच महापालिका आयुक्त रूदेश घाळी कोरोनाबाधित असल्याने निवडणुकीचा प्रस्ताव प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविण्यात आला नव्हता.
महापौर-उपमहापौर निवडणूक प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याने निवडणुकीचा प्रस्ताव प्रादेशिक आयुक्तांकडे सोमवारी पाठविण्यात आला. निवडणुकीत मतदानास पात्र असलेल्या नगरसेवकांसह लोकप्रतिनिधींची मतदार यादी देखील सादर करण्यात आली आहे. कौन्सिल विभागाकडून सोमवारी हा प्रस्ताव देण्यात आला असून निवडणुकीसाठी सभा आयोजित करण्यात येते. सभा आयोजित करण्यापूर्वी 7 दिवस आधी नोटीस पाठविणे बंधनकारक आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडणुकीची तारीख तिसऱया आठवडय़ात जाहीर होण्याची शक्मयता आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीची घोषणा कधी होणार याकडे नगरसेवकांसह शहरवासियांचे लक्ष लागले आहे.