महापौरपदासाठी रोहित मोन्सेरातचे नाव
प्रतिनिधी/ पणजी
पणजी महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आता महापौर-उपमहापौरपद निवडणुकीची तयारी सुरू असून ती उद्या मंगळवारी दि. 30 रोजी स. 11 वा. पणजी मनपा सभागृहात होणार आहे.
दोन्ही पदांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत सोमवारी 29 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आज सोमवारीच अर्ज सादर केल्यानंतर महापौर-उपमहापौर कोण बनणार हे कळणार आहे. दरम्यान, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात हे त्यांचा मुलगा रोहित मोन्सेरात यांना महापौर बनवणार आणि उपमहापौरपद महिला नगरसेवकाला देणार, असे वृत्त आहे.
मोन्सेरात यांच्या गटाने पणजी मनपातील 30 प्रभागांपैकी 25 प्रभागांत विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे बाबूश मोन्सेरात जो ठरवतील तोच उमेदवार महापौर-उपमहापौरपदी बसणार आहे. विरोधी गट नसल्यामुळे प्रत्यक्षात निवडणूक न होता त्या दोन्ही पदांसाठी उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवख्या उमेदवाराला महापौर करणे अयोग्य !
दरम्यान, महापौर-उपमहापौर या दोन्ही पदांसाठी अनुभवी नगरसेवकांची निवड अपेक्षित असून कोणताही अनुभव नसलेल्या नवख्या उमेदवाराला थेट महापौर बनविणे अयोग्य असल्याची चर्चा नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये सुरू आहे.
सर्व करांचा भरणा 31 मे पूर्वी करा- आयुक्त
पणजी महापालिका क्षेत्रातील इमारतींचे मालक, करदाते या सर्वांनी त्यांना लागू असलेले विविध प्रकारचे कर, घरपट्टी, व्यापारी परवाना शुल्क, फलक कर, सांडपाणी कर 31 मे पूर्वी भरावेत, अशी सूचना मनपा आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी जारी केली आहे. प्रत्येकाला वैयक्तिक बिल देण्यात येणार नाही. कर भरताना जुनी पावती दाखवावी आणि कर रोख किंवा धनादेशाद्वारे भरणा करावा. अन्यथा 31 मे नंतर सर्व करांवर दंड आकारला जाणार असल्याचे आयुक्त रॉड्रिग्स यांनी कळविले आहे.