प्रतिनिधी/ पणजी
पणजी मनपाला आता नव्या महापौरांचे वेध लागले आहेत. विद्यमान महापौर रोहित मोन्सेरात यांचा एका वर्षाचा कार्यकाळ मार्च अखेर संपुष्टात येत असून नवीन महापौर निवडीसाठी 30 मार्च रोजी निवडणूक होण्याची शक्यता आहे.
राज्यातील एकमेव असलेल्या पणजी महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत 30 पैकी 25 नगरसेवक विजयी होऊन बाबूश मोन्सेरात पॅनलने निर्विवाद बहुमत मिळविले होते. त्यात माजी महापौर उदय मडकईकर आणि सुरेंद्र फुर्तादो यांचाही समावेश होता. परंतु मडकईकर यांना पुन्हा संधी न देता बाबूश यांनी प्रथमच विजयी झालेला स्वतःचा पुत्र रोहित यांना महापौर बनविले होते. त्यामुळे बाबूश आणि मडकईकर यांच्यात वितुष्ट निर्माण होऊन मडकईकर यांनी त्यांच्यापासून फारकत घेतली होती.
आता 30 रोजी होणाऱया महापौर निवडीतही सदर दोन्ही माजी महापौर स्पर्धेत उतरणार नसल्याचे याआधीच त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याशिवाय बाबूश मोन्सेरात पुन्हा एकदा पणजीचे आमदार म्हणून विजयी झाले असल्याने मनपावर महापौर म्हणूनही रोहित यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.