महाबळेश्वर / प्रतिनिधी :
महाबळेश्वरपासून एक किमी अंतरावर असलेल्या प्रतापसिंह उद्यानाजवळ शनिवारी रात्री उशिरा एक कार सात ते आठ फुट खोल खड्डयात कोसळली. यात पुणे येथील भुलतज्ञ डाॅ. रिमा मानोहर बौधे (वय 32) आणि त्यांचा मित्र जखमी झाला. स्थानिक युवकांनी या दोघांना उपचारासाठी रूग्णालयात भरती केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बौधे या आपल्या मित्रासह महाबळेश्वरला पर्यटनासाठी आल्या होत्या. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास रस्त्यावर प्रचंड धुके पसरले होते, रस्त्यावरील स्ट्रीट लाईट देखिल बंद होत्या. त्यामुळे अंदाज न आल्याने त्यांची कार सात ते आठ फूट खोल खड्ड्यात कोसळली.
दरम्यान, त्याचवेळी नोबिन खान व मुस्तकिन बागवान हे दोघे महाबळेश्वरहुन वाईकडे निघाले होते. त्यांची गाडी प्रतापसिंह उद्यानाजवळ येताच त्यांना एका महीलेचा वाचवा..वाचवा.. असा आवाज आला. तेव्हा गाडी थांबवून त्यांनी पाहिले असता त्यांना एक कार सात ते आठ फूट खोल खड्ड्यात पडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ मदतकार्य करत गाडीतून दोघांना बाहेर काढले.
स्थानिक युवकांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून दोघांना येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रविवारी दुपारपर्यंत या अपघाताची नोंद महाबळेश्वर पोलिस ठाण्यात झाली नव्हती.