वार्ताहर / कास :
महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने एक कार दरीत कोसळली. या अपघातात तीन शिक्षक गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी वाई येथे हलविण्यात आले आहे. आज सकाळी हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी तापोळा- महाबळेश्वर रोडवरून खांबील गोल येथील शाळेकडे निघालेल्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या कारला अपघात झाला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार खचलेल्या दरीत पलटी झाली. या अपघातात कारमधील वाळणे शाळेचे शिक्षक अंकुश टेबरे, आवळण शाळेचे विलास आवळे आणि वेंगळे शाळेचे राजेंद्र पिसाळ हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरता उपचार करून पुढील उपचारासाठी वाई येथे हालविण्यात आले आहे.