प्रतिनिधी / महाबळेश्वर :
थंड हवेचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ, देशविदेशातील लाखो हौशी पर्यटकांच्या हक्काचे ठिकाण असलेले महाबळेश्वर गांधी जयंती व रविवार सुट्टय़ा लागून आल्यामुळे पर्यटकांनी बहरले आहे. महाबळेश्वरात आता पर्यटकांच्या हंगामास प्रारंभ झाला असून, पर्यटकांच्या आगमनाने महाबळेश्वर फुलल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पर्यटनास आलेले पर्यटक येथील हिरवाईने नटलेले निसर्गसौंदर्य पाहण्यात, अनुभवण्यात मश्गुल झाले आहेत.
कोरोनाच्या गेल्या सात महिन्यांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर या थंड हवेच्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी आता खऱ्या अर्थाने हंगामास प्रारंभ झाला असून, देशविदेशातील पर्यटकांची पावले महाबळेश्वर पर्यटनस्थळी वळू लागली आहेत. सध्या शनिवार, रविवार सुट्टी असल्याने महाबळेश्वरमध्ये मोठय़ा प्रमाणावर पर्यटकांची रेलचेल असून येथील प्रसिद्ध केट्स पॉईंट, महाबळेश्वरची शान असलेला ऑर्थरसीट पॉईंट, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले प्रतापगड, लॉडवीक पॉइंट, विल्सन पॉइंट, सुर्यास्तासाठी प्रसिद्ध मुंबई पॉइंटसह पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण लिंगमळा धबधबा ही पर्यटकांच्या पसंतीची ठिकाण असलेली ही पर्यटनस्थळे गर्दीने गजबजली आहेत. पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत तर मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेल्या नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला जणू जणू ”चौपाटी”चे स्वरूप प्राप्त झाले आहे. पालिकेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली असून सोशल डिस्टंसीग पाळून पर्यटकांना नौकाविहारासाठी रांगा लागण्याचे चित्र आहे.