ऑनलाईन टीम / सातारा :
महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर वाघ फिरत असल्याचा व्हिडिओ महिंद्रा ऍन्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी रविवारी सायंकाळी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
आनंद महिंद्रांनी ट्विट केलेल्या वाघाच्या व्हिडिओमध्ये हे वाघ 19 ऑगस्ट 2021 रोजी पाचगणीजवळच्या मार्गावर रात्रीच्या वेळी दिसल्याचे सांगण्यात आले आहे. या व्हिडिओला त्यांनी एक कॅप्शनही दिले आहे. ‘…तर हायवेवर केवळ आमची एक्सयूव्ही ही एकमेव बिग कॅट नाहीय. भन्नाट आहे हे..’ अशा कॅप्शनमुळे महाबळेश्वर-पाचगणीमध्ये खरंच रस्त्यावर वाघ फिरत आहेत का? याची उत्सुकता नेटकऱ्यांना आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील जुना असून, तो 2019 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.