प्रतिनिधी / कोल्हापूर
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कोल्हापुरातील कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यवाह शेलार यांनी 8 संचालकांना लालुच दाखवून स्वार्थ साधला. महामंडळ लुटण्यासाठीच त्यांनी अविश्वास ठरावाची खेळी केल्याचा आरोप अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केला. महामंडळाच्या घटनेत अध्यक्षांवर अविश्वास ठरावाची तरतूद नाही. अध्यक्षबदलाची पुर्वनोटीस नाही, विषयपत्रिकेवर विषयही नाही. त्यामुळे प्रभारी अध्यक्षांची निवडच बेकायदेशीर आहे. आजही महामंडळाचे आपणच अध्यक्ष आहोत, अशी माहिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.
चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक गुरूवारी कोल्हापुरात झाली. या बैठकीत अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर 8 विरूद्ध 4 मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. बैठकीत उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड झाली. यासंदर्भात शुक्रवारी येथील प्रेस क्लबमध्ये अध्यक्ष राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत वस्तुस्थिती स्पष्ट केले. यावेळी खजीनदार संजय ठुबे, सहकार्यवाह चैत्राली डोंगरे, सहखजिनदार शरद चव्हाण, रवी गावडे उपस्थित होते.
मेघराज राजेभोसले म्हणाले, कालच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्याविरोधात अवैध, घटनाबाहÎ रितीने अविश्वास ठराव आणला. एकमेकांचा स्वार्थ साधण्यासाठी 8 संचालकांना लालूच दाखवून कार्यवाह सुशांत शेलार यांनी ही खेळी केली. बैठकीच्या एकाच तारखेच्या दोन नोटीसा होत्या. पहिल्या नोटिसीनुसार श्रद्धांजली ठरावानंतर मागील ऑडिटला मंजुरीचा ठराव अपेक्षित होता. पण तो बाजूला टाकत अविश्वास ठराव पुढे आला. ऑडीट रिपोर्टला 30 नोव्हेंबरपुर्वी मंजुरी न मिळाल्याने महामंडळाला पेनल्ट्रीला सामोरे जावे लागणार आहे. याला कार्यवाह अन् हे खेळी करणारे जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.
कोरोनामुळे संचालक मंडळाच्या बैठका 10 महिने थांबल्या होत्या, गुरूवारच्या बैठकीत सभासदांचे प्रश्न, अभिनेत्री रंजना वैद्यकीय सहाय योजना, अनंत माने आर्थिक सहाय योजनेसाठी आलेले प्रस्ताव, गेल्या ऑडीट रिपोर्टवर चर्चा अपेक्षित होती. पण गोंधळ घालत आपल्यावर अविश्वास ठराव आणला. पण तो बेकायदेशीर आहे. महामंडळाच्या घटनेत अध्यक्षांवर अविश्वास ठरावाची कसलीही तरतूद नाही. अविश्वास ठराव आणायचा असेल तर 7 दिवसांपुर्वी नोटीस देणे बंधनकारक आहे, पण तीही दिलेली नाही. बैठकीच्या विषयपत्रिकेवरही अध्यक्ष बदलाचा मुद्दा नाही.
आपल्यावरील अविश्वास ठरावानंतर यमकर यांची प्रभारी अध्यक्षपदी निवड करून बैठक संपली, पण महामंडळाच्या फायद्याचे कोणतेही निर्णय झाले नाहीत. त्यामुळे आपल्याला अध्यक्षपदावरून खाली खेचायचे, यासाठी शेलार यांनी काही संचालकांना लालूच दाखवून स्वार्थ साधल्याचा आरोप त्यांनी केला.
आमिषांतून 8 संचालकांनी साधला स्वार्थ : राजेभोसले
धनाजी यमकर यांच्यावर धनादेश चोरी, महिला कर्मचाऱयावर शेरेबाजीतून मुक्ती देणे, रणजित जाधव यांच्या अवैध संचालकपदासंदर्भाती नोटिसीची कार्यवाही थांबवणे, सतीश रणदिवे, सतीश बिडकर यांच्यावर सभासदत्व रद्द संदर्भातील नोटीस प्रक्रिया थांबवणे, वर्षा उसगावकर या समांतर सभेला उपस्थित होत्या, त्यांच्यावरील कारणे दाखवा नोटीस रद्द करणे, उसगावकर यांच्या वाढीव भत्त्याचा ठराव रद्द करणे, पितांबर काळे समांतर सभेत उपस्थित होते, त्यांचीही नोटीस थांबवणे या कार्यवाह सुशांत शेलार यांच्या आमिषाला 8 संचालक बळी पडले. अन् स्वार्थातून आपल्यावरील अविश्वास ठरावाची वस्तुस्थिती राजेभोसले यांनी मांडली.