कुंकळ्ळीतील कार्यक्रमात पत्रकारांचा सत्कार
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
पत्रकार हेही कोविड योद्धे असून कोविड महामारीच्या काळात महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. वार्तांकन करताना त्यांनी आपल्या आरोग्याची पर्वा केली नाही. चांगली माहिती देऊन नागरिकांत त्यांनी जागृती घडवून आणली आणि लोकांच्या मनातील भीती काढली. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्याची संधी आता मिळत असून म्हणूनच त्यांचा सत्कार करण्यात येत आहे, असे उद्गार कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांनी काढले.
आमदार डायस यांच्यातर्फे कुंकळ्ळीतील पालिका सभागृहात आयोजिण्यात आलेल्या गौरव सोहळय़ात पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यात कमलाक्ष प्रभुगावकर, सांवरकटा-कुंकळ्ळी, सुनील फातर्पेकर, फातर्पा, विजयकुमार कोप्रे देसाई, कुलवाडा व रमेश राऊत नाईक, बाळळी यांचा समावेश राहिला. यावेळी व्यासपीठावर कुंकळ्ळी पालिकेचे नगरसेवक तथा कुंकळ्ळी एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष विदेश देसाई, नगरसेवक विशाल देसाई, रूपा गावकर, कुंकळ्ळी भाजप मंडळ अध्यक्ष मारूती देसाई, बाळळी पंच प्रतिमा नाईक व प्रज्ञा फळदेसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.