वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू वर्ष कोविड19 च्या महामारीमुळे विविध अडचणींनीयुक्त ठरले. परंतु नवीन वर्ष हे नवीन उमेद घेऊन झेपावणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये देशाचे निर्यात क्षेत्र 2021 मध्ये तेजीने मजबूत होत प्रवास करणार असल्याची माहिती आहे. कारण जगातील मंदावलेली बाजारपेठ पुन्हा नव्याने तेजी पकडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जगभरात प्रामुख्याने संरक्षणवादामुळे आणि अनिश्चित व्यापारी स्थितीमुळे येणाऱया महिन्यांमध्ये निर्यात क्षेत्रावर काहीसा परिणाम राहणार असल्याचे संकेत आहेत. निर्यातीचा कल जर का वाढत गेल्यास 2021 पासून निर्यातीत एक उल्लेखनीय वृद्धी पहावयास मिळणार असून यात कोविड19 साठी लसी येण्याच्या बातम्यांमुळे विकसित देशांसह विकसनशील देशांमधील मागणीही वाढत जाणार आहे. याचाही प्रभाव निर्यातीवर राहणार आहे.
डब्ल्युटीओचा अंदाज जागतिक व्यापारी संघटना (डब्ल्युटीओ) यांच्याकडून ऑक्टोबर महिन्यात व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार 2020 मध्ये जागतिक व्यापारात 9.2 टक्के घसरण राहणार असल्याचे म्हटले आहे. यानंतर मात्र या आकडेवारीत सुधारणा होत 2021 मध्ये 7.2 टक्क्यांची मजबूत वृद्धी प्राप्त होणार असल्याचे संकेत आहेत. अनिश्चित वातावरणामुळे व्यापार क्षेत्र चिंतेत होते. सरकारी मदत आणि अन्य सुधारणांमुळे व्यापार क्षेत्र सावरत आहे.