वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळच्या जाखमाता मंदिराजवळ मुंबईहून मालवणला जाणाऱया क्वॉलीसने पुढून येणाऱया कंटेनरला समोरुन धडक दिल्याने क्वॉलीस गाडीमधील महिलेचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये चालकासह तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सकाळी घडला.
या अपघातात सीमा जगदीश पडवळ (58, रा. संकल्पसिध्दी को ऑप. हाऊसिंग सोसायटी रामनगर, गोरेगाव इस्ट) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर क्वॉलीस चालक निखिल बाळकृष्ण टेमकर, जगदीश ज्ञानदेव पडवळ आणि सौरभ जगदीश पडवळ हे तिघेजण जखमी झाले आहेत. सर्व राहणार संकल्पसिध्दी को. ऑप. हाऊसिंग सोसायटी रामनगर गोरेगाव येथील आहेत. या बाबत कंटेनर चालक संजय प्रकाश सिंग यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कंटेनर चालक संजय सिंग हा कंटेनर (एम. एच. 06 एक्यु 2618) हा गोवा ते न्हावाशेवा-मुंबई असा घेवून जात होता. रविवारी सकाळी 8 च्या दरम्यान संगमेश्वरजवळच्या जाखमाता मंदिराजवळ कंटेनर आला असता मुंबईहून मालवणला जात असलेल्या क्वॉलीसचे (एम. एच. 04 ए. वाय. 8088) चालक निखिल बाळकृष्ण टेमकर याचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी समोरुन येणाऱया कंटेनरवर आदळली.
या अपघातात क्वॉलीसमधील सीमा पडवळ यांना गंभीर इजा झाल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर क्वॉलीसमधील जगदीश ज्ञानदेव पडवळ व सौरभ पडवळ हे गंभीर जखमी झाले. गाडीची धडक इतकी जोरात होती की, क्वॉलीस गाडी कंटेनरच्या आतमध्ये जावून अडकली. अपघाताचे वृत्त समजताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस संतोष झाडपेकर, पन्हाळे, आव्हाड आदींनी घटनास्थळी जावून जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ संतोष खातू, निखिल लोध, रौफ खान आदींनी मदत केली. रुग्णवाहिकेने जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक उपचार सुरु आहेत.
क्वॉलीस चालकावर गुन्हा दाखल
महामार्गावर भरधाव वेगाने आणि अविचाराने गाडी चालवणाऱया क्वॉलीस चालक निखिल बाळकृष्ण टेमकर याच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊन शिथिलतेनंतर संगमेश्वर पुन्हा अपघाग्रस्त
दोन दिवसापूर्वी आराम बस ज्या ठिकाणी जळून खाक झाली होती, त्या पासून अगदी जवळच क्वॉलीस आणि कंटेनरचा भीषण अपघात घडल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनच्या दरम्याने शांत असणारा संगमेश्वर परिसर लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा अपघातग्रस्त बनला आहे.