प्रतिनिधी/ कराड
ट्रक्टर आणि ट्रकचा किरकोळ अपघात झाल्याची घटना गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत शनिवारी पहाटे चार वाजता घडली. किरकोळ अपघातानंतर दोन वाहनधारकांच्यात महामार्गावरच चर्चा सुरू होती. त्याचवेळी अचानक भरधाव आलेल्या दुसऱया एका ट्रकने तिघांना उडवले. यामध्ये आयशर चालक बाबुराव बिरू माने (रा. तासगाव, जि. सांगली) हे जागीच ठार झाले, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
सयाजी रामचंद्र जमाले (वय 55, रा. मुंढे, ता. कराड), भाऊसाहेब रामदास येडे (वय 25, रा. बीड) हे जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शनिवारी पहाटे एक ट्रक्टर महामार्गावरून कराड बाजूकडे निघाला होता. गोटे गावच्या हद्दीत आल्यावर ट्रक्टरला आयशर टेम्पो किरकोळ घासल्याने दोन्ही वाहने महामार्गावरच थांबली. ट्रक्टरचालक व आयशर टेम्पोचालकात महामार्गावर नुकसानभरपाईबाबत चर्चा सुरू झाली. आयशर चालक बाबुराव माने व ट्रक्टर चालक भाऊसाहेब येडे यांच्यात चर्चा सुरू असताना तिथे मुंढे येथील सयाजी जमाले आले. शाब्दिक चकमक सुरू असतानाच दुसरा भरधाव ट्रक वेगाने आला. ट्रकने रस्त्यावर उभ्या असणाऱया तिघांना उडवले. तिघांनाही गंभीर दुखापत झाली. यामध्ये बाबुराव माने गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले, तर भाऊसाहेब येडे व सयाजी जमाले जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, अमित पवार, योगेश पवार, कराड पोलीस ठाण्याचे हवालदार प्रशांत जाधव तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेचा पंचनामा करून शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
दरम्यान, महामार्गावर पहाटेच्या अंधारात वाद घालणे तिघांनाही अडचणीत आणणारे ठरले. महामार्गावर वाहने उभा करणे किंवा स्वतः उभा राहणे धोकादायक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.