लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांची लूट : निपाणी ते संकेश्वरपर्यंत गस्तीची मागणी
प्रतिनिधी /संकेश्वर
संकेश्वर ते निपाणी तवंदी घाटापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळेत अज्ञात भुरटय़ा चोरटय़ांकडून लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने प्रवाशांना थांबवून त्यांची लूट करण्यात येत असल्याचे प्रकार नुकतेच उघडकीस आले आहेत. यातून रोकड, दागिने, मोबाईल संचसह अन्य साहित्य लांबविले जात आहेत. अशा चोरटय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी तवंदी घाट ते संकेश्वरपर्यंत पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
काही दिवसांपूर्वी तवंदी घाटात दुचाकीस्वाराला अडवून तिघा चोरटय़ांकडून युवकाला मारहाण करताना लुटण्याचा प्रकार घडला होता. ही घटना ताजी असतानाच संकेश्वरकडून कोल्हापूरकडे दुचाकीवरून जाणाऱया दाम्पत्याला सोलापूर फाटय़ापासून दुचाकीवरील दोघा भामटय़ांनी पाठलाग करून दाम्पत्याला अडविले. त्यानंतर दुचाकीला धडक देत महिलेच्या गळय़ातील दागिने हिसकावून पोबारा केला होता. यावेळी महिला दुचाकीवरून महामार्गावर आपटल्याने महिला जखमी झाली होती. यानंतर सदर भामटे पसार झाले होते.
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
तवंदी घाट मार्गापासून सोलापूर फाटय़ापर्यंत रात्रीच्या वेळी अशा भामटय़ांकडून दुचाकी, चारचाकी वाहनांना टार्गेट करून त्यांना विविध कारणांनी थांबवून त्यांना धाक दाखवून लुटीचे प्रकार घडत आहेत. काहीवेळा चोरटय़ांकडून मारहाणही करण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. अशा या लुटीतून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची दखल घेत येथील पोलिसांनी तवंदी घाटमार्गापासून संकेश्वरपर्यंत महामार्गावर रात्रीची गस्त घालण्यास सुरुवात करावी तसेच लुटीच्या घटनांना आवर घालावा, अशी मागणी प्रवाशी वर्गातून करण्यात येत आहे.