प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणातील महत्वाच्या असलेल्या येथील वाशिष्ठी नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंच्या ऍप्रोच रोडचे काम सोमवारी पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी सज्ज झाली आहे. मात्र पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आखला जात असल्याने प्रत्यक्षात वाहतूक लगेच सुरू हेणार नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
वाशिष्ठी नदीवरील हा पूल 247.5 मीटर लांबीचा असून तो कोकणातून जाणाऱया मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात मोठय़ा लांबीचा आहे. 2018 मध्ये या पुलाच्या कामास प्रारंभ झाला. सुरूवातीला वेगाने सुरू असलेले काम नंतर रखडले. ठेकेदार बदलून चौपदरीकरणाचे काम करणाऱया कंत्राटदार कंपनीकडे हा पूल जून 2019 मध्ये सोपवण्यात आला. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे पूल बांधकामात व्यत्यय आला. पुलासाठी कंत्राटदार कंपनी ईगल चेतक इन्फ्रा कंपनीला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयानेही दखल घेऊन 31 ऑगस्टपर्यत पूल पूर्ण करण्याची मुदत दिली होती.
पुलाचे काम सुरू असतानाच 22 जुलैच्या अतिवृष्टीत जुन्या दोन्ही पुलांमधील भराव वाहून गेल्यानंतर या कामाला काही दिवस बेक लागला होता. ऍप्रोच रोडसाठी लागणारी माती नदीतूनच काढण्याची परवानगी मिळाल्याने रात्रंदिवस काम करत अखेर दोन्ही ऍप्रोच रस्ते सोमवारी पूर्णत्वास गेले. सोमवारी पुलाची एक मार्गिका वाहतुकीसठी सज्ज करण्यात आली आहे.
पुलाचे काम पूर्ण होऊन एक मार्गिका वाहतुकीसाठी मंगळवारपासून खुली होणार असतानाच पुलाचे उद्घाटन करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी दिल्लीतूनच या पुलाचे ऑनलाईन उद्घाटन करतील अथवा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत येथे उद्घाटन केले जाईल असे वृत्त आहे. तसे झाल्यास पुलावरून वाहतूक सुरू होण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे