कराड : पुणे-बेंगळूर महामार्गावर कराडलगत वाठार येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या ठार झाला. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात हलवले. तेथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याने नंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने बिबट्याचे दहन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार दि.26 रोजी सकाळी 5.30 वाजता वनक्षेत्रपाल बामणोली बाळकृष्ण हसबनिस यांना महामार्गावर कराड तालुक्यातील वाठारजवळ असलेल्या पुलाजवळ बिबट्या जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वनक्षेत्रपाल हसबनिस यांनी तात्काळ कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना फोन करून याची माहिती दिली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल तुषार नवले व त्यांचे सहकारी यांनी त्वरित घटनास्थळाकडे धाव घेतली. तेथे पाहणी केली असता त्यांना बिबट्या मृत अवस्थेत रस्त्यावर पडल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथील पशुसंवर्धन दवाखान्यात आणला. तेथे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.अपघातामध्ये बिबट्याच्या डाव्या बाजूच्या शरीरावरील कंबरेवर जोरात धडक बसल्याने मोठ्या प्रमाणावर अंर्तगत रक्तस्त्राव झाले असल्याचे शवविच्छेदनामध्ये स्पष्ट झाले आहे. वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याचे दहन केले असून, बिबट्याला नेमक्या कोणत्या वाहनाने धडक दिली याचा शोध घेतला जात आहे.