वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळच्या रामकुंड वळणावर गोव्याहून मुंबईकडे जाणाऱया डंपर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने डंपर विद्युत पोलाला जाऊन धडकला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री 2 च्या दरम्यान घडला.
अपघातात डंपर चालक गुरुदास सूर्या चोडणकर (56, रा. गोवा) याचा मृत्यू झाला. चोडणकर हा डंपर गोव्याहून मुंबईला घेऊन जात होता. तो संगमेश्वरजवळच्या रामकुंड वळणार आला असता वाहनावरील ताबा सुटल्याने डंपर पोलला जाऊन धडकला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. अपघाताची खबर मिळताच ग्रामस्थांनी चोडणकरला संगमेश्वर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मोरे यांनी उपचार केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास संगमेश्वर पोलीस शिंदे करत आहेत.
विद्युत पोल तुटून जमिनीवर पडला
महामार्गाच्या कडेला असलेल्या विद्युत पोलला डंपरची लागलेली धडक एवढी जोरात होती की, विद्युत पोल तुटून जमिनीवर पडला. त्यामुळे संगमेश्वरजवळच्या रामपेठ येथील विद्युत पुरवठा खंडित झाला. याची महावितरणला खबर मिळताच त्यांनी त्वरित वीजपुरवठा खंडित केला आणि शनिवारी सकाळच्यादरम्यान पुन्हा वीजपुरवठा सुरू केला.