वाहतूक नियम बदलणार ब्रिटनचे सरकार
सायकल चालविणाऱयांना मिळणार स्थान
ब्रिटनमध्ये सरकारने सायकल चालविणे आणि पायी चालणाऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी 3,495 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. तसेच सरकार महामार्गाच्या वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. याचा प्रस्ताव लवकरच संसदेत मांडला जाईल. प्रस्ताव संमत झाल्यावर नवे नियम पुढील वर्षापासून लागू होतील. या प्रस्तावाला मोटरिंग समुहांनी विरोध केला आहे.
नव्या नियमांमध्ये पायी चालणारे आणि सायकल चालविणाऱयांना प्राधान्य मिळणार आहे. महामार्गावरील स्टॉप आणि झेब्रा क्रॉसिंगवर प्रथम पायी चालणारे आणि सायकलस्वारांना मार्ग देण्याची सूचना वाहनचालकांना केली जाईल. वाहन चालकांना आता स्टॉप किंवा झेब्रा क्रॉसिंग नजीक येताच वेग कमी करावा लागेल किंवा वाहन थांबवावे लागणार आहे.
सायकलस्वार आणि पायी चालणाऱयांची सुरक्षा मोटरचालकांना विचारात घ्यावी लागणार आहे. सायकलिंगला बळ देणारी संघटना ‘सायकलिंग युके’ने नियमांमधील बदलांचे स्वागत केले आहे. नव्या नियमांमुळे मोठय़ा वाहनचालकांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होईल असे संघटनेने म्हटले आहे.
मोटरिंग समुहांकडून निंदा नव्या नियमांमध्ये रस्ते वापरकर्त्यांच्या जबाबदारीचा क्रमही अधोरेखित करण्यात आला आहे. पायी चालणारे, सायकलस्वार घोडेस्वार, बाइक आणि वाहनचालक असा हा क्रम आहे. रस्त्यावर सर्वाधिक जबाबदारी वाहनचालकाची असणार आहे. या नियमामुळे पायी चालणारे किंवा सायकलस्वारांच्या चुकीमुळे झालेल्या रस्ते दुर्घटनेचा दोष वाहनचालकांच्या माथी मारला जाण्याची भीती राहणार असल्याचे अलायन्स ऑफ ब्रिटिश ड्रायव्हर्स आणि अन्य मोटरिंग समुहांचे म्हणणे आहे.