खानापूर / प्रतिनिधी
बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण व दुपदरीकरण कामासंदर्भात आमदार अंजली निंबाळकर यांनी बुधवारी कर्नाटक विधानसभेत आवाज उठवून त्याकडे शासनाचे लक्ष वेधले. या रस्त्यापैकी खानापूर-रामनगर-अनमोड रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत पडल्याने या रस्त्यावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील जनतेचा तसेच शाळा-कॉलेजसाठी येणाऱया विद्यार्थी वर्गावर मोठे संकट ओढवले आहे. याबद्दल राज्य शासनाने कोणती पावले उचलली, असा त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील यांना सवाल केला. व रस्त्याचा प्रश्न गंभीर असल्याने त्याचे काम तातडीने सुरु करण्याविषयी सरकारकडून कोणती पावले उचलण्यात आली आहे. याची माहिती द्यावी, अशी मागणी केली.
यावर बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कर्नाटक राज्य हद्दीतील 84.120 कि. मी. रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी बेळगाव-खानापूर 30.80 कि. मी. रस्ता चौपदरी होणार असून कि. मी. 30.80 ते 70.80 व 70.80 ते 84.120 कि. मी. रस्त्याचे दुपदरीकरण केले जात आहे. या दुपदरीकरणासाठी 380 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या दुपदरीकरणामध्ये खानापूर, रामनगर तसेच रामनगर-अनमोड घाटातील कर्नाटक हद्दीपर्यंतच्या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्याचे काम दिलीप बिल्डकॉन कंपनीने घेतले आहे. रस्त्याचे काम सुरु असतानाच पर्यावरण वाद्यानी त्या रस्त्याच्या कामाला स्थगिती आणल्याने ते काम बंद पडले होते. पण ही स्थगिती दि. 30 मार्च 2021 रोजी उच्च न्यायालयाने उठविली. पण रस्त्याच्या कामासाठी वन आणि पर्यावरण खात्याने दिलेली मुदत संपली होती. पण ती देखील मुदत पुन्हा वाढवून मिळाल्याने 14-06-2021 रोजी उपविभाग अरण्य अधिकारी हल्याळ यांनी पुन्हा एकदा मुदत वाढवून दिल्याचे पत्र महामार्ग प्राधिकरणाला दिले आहे. पण आता या रस्त्याच्या कामाची फेरनिविदा प्रक्रिया सुरु असून ती लवकरात लवकर पूर्ण करुन कामाला सुरवात करणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाने राज्य शासनाला दिली आहे. असे उत्तरात सांगितले.
यावर पुन्हा आमदार निंबाळकर यांनी सध्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहतुकीला अडचण होत आहे. याचे काय, असा सवाला केला. त्यावर मंत्री सी. सी. पाटील यांनी मुख्य काम सुरु होण्यापर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ‘अर्जुनवैष्णवी इन्फ्रॉस्ट्रक्चर ऍन्ड डेव्हलर्पस’ कंपनीवर सोपवण्यात आली असून त्या कंपनीकडून रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे. तसेच सद्यपरिस्थितीत या रस्त्यावरुन अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली असल्याची माहिती सी. सी. पाटील यांनी आपल्या उत्तरात दिली. हा रस्ता बंद असल्याने वाहतुकीची पर्यायी व्यवस्था कुठल्या मार्गाने सुरु आहे. असा सवालही आमदार अंजली निंबाळकर यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना सी. सी. पाटील म्हणाले, गोव्याकडे जाणाऱया अवजड वाहतूक चंदगड-सावंतवाडी मार्गे तसेच इतर वाहतूक बेळगाव-चोर्ला मार्गे सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.