शहापूर विभाग समितीच्या बैठकीत निर्धार : मोठय़ा संख्येने उपस्थितीचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन भरविले जात आहे. स्थानिकांचा विरोध असूनही केवळ दडपशाही करत सुवर्णसौधचे बांधकाम करण्यात आले आहे. मराठी प्रदेशावर आपला हक्क दाखवून देण्यासाठीचा हा एक प्रयत्न असून मराठी भाषिक याला न जुमानता दि. 13 रोजी होणाऱया महामेळाव्यातून मराठी अस्मिता दाखवून देणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत महामेळावा यशस्वी करणारच, असा निर्धार शहापूर विभाग म. ए. समितीच्यावतीने गुरुवारी आयोजित बैठकीत करण्यात आला.
रामलिंगवाडी गोवावेस येथील सिद्धिविनायक मंदिरात बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे ज्येष्ट कार्यकर्ते शिवाजी हावळाण्णाचे होते. प्रारंभी सेनादलांचे प्रमुख बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
13 डिसेंबर रोजी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून त्याचदिवशी टिळकवाडीच्या व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जागृती करायची आहे. महामेळाव्याला शहापूर विभाग म. ए. समितीने जाहीर पाठिंबा देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. लोकसभेत सीमाप्रश्न मांडल्याबद्दल शिवसेना गटनेते व खासदार अरविंद सावंत यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
या बैठकीला शिवसेना उपशहरप्रमुख राजकुमार बोकडे, रवी जाधव, राजाराम मजुकर, रणजित हावळाण्णाचे, सुनील बोकडे, मनोहर शहापूरकर, शशिकांत सडेकर, आकाश मठवाले, चंद्रकांत मजूकर, सिद्धार्थ इंगळे, अमित काकतकर, श्रीशैल पाटील, दीपक तुळसकर, रजत बोकडे, सदानंद बिर्जे, उमेश भातकांडे, राकेश सावंत, राजू नेसरीकर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. अभिजित मजुकर यांनी आभार मानले.