वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश आणि पक्षांतराचे राजकारण सुरू झाले आहे. रविवारी लखनौमध्ये महाराज सुहेलदेव यांचे वंशज मोनू राजभर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह महाराज सुहेलदेव सेनाचे अध्यक्ष बब्बन राजभर यांनीही स्वतःच्या समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. तसेच माजी आमदार कालीचरण यांनीही असेच पाऊल उचलले आहे.
पूर्वांचलच्या अनेक जिल्हय़ांमध्ये राजभर समुदायाची मते राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्ती राखून आहेत. उत्तरप्रदेशात राजभर समुदायाची लोकसंख्या सुमारे 3 टक्के आहे. पण पूर्वांचलच्या जिल्हय़ांमध्ये राजभर मतदारांची संख्या 12 ते 22 टक्क्यांदरम्यान आहे. गाजीपूर, चंदौली, मऊ, बलिया, देवरिया, आझमगढ, लालगंज, आंबेडकरनगर, मछलीशहर, जौनपूर, वाराणसी, मिर्झापूर आणि भदोहीमध्ये त्यांची संख्या लक्षणीय आहे. राज्यातील 48 मतदारसंघांवर या समुदायाचा प्रभाव दिसून येतो.
2017 मध्ये ओमप्रकाश राजभर यांनी भाजपसोबत आघाडी करत निवडणूक लढविली होती. याचा राजकीय लाभ दोन्ही पक्षांना झाला होता. राज्यातील सुमारे 22 मतदारसंघातील भाजपच्या विजयात राजभर मतपेढीने हातभार लावला होता. तर ओमप्रकाश राजभर यांच्या पक्षाला 4 ठिकाणी विजय मिळाला होता.
महाराज सुहेलदेव
11 व्या शतकात श्रावस्तीचे सम्राट राहिलेले महाराज सुहेलदेव यांना एक महान योद्धा म्हणून ओळखले जाते. महमूद गजनवीने हिंदुस्थानावर आक्रमण केल्यावर त्याच्या सैन्याला महाराज सुहेलदेव यींनी बहराइच येथील युद्धात धूळ चारली होती.