ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे आज पहाटे चार वाजता निधन झाले.
नीला सत्यनारायण या 1972 बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त अशी त्यांची ओळख होती. सनदी अधिकारी म्हणून 37 वर्षांची त्यांची प्रदीर्घ कारकीर्द होती.
नीला सत्यनारायण यांची सनदी अधिकारी आणि साहित्यिक म्हणून देखील ओळख होती. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून 13 पुस्तके लिहिली होती. त्यांचे ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्र गाजले होते. त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवडत असे.
दरम्यान, त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा आणि पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.