ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पदी संजयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे मुख्य सचिव अजय मेहता हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार असतील.
अजय मेहता यांची मुख्य सचिव पदाची मुदत 30 जून रोजी संपत आहे. त्यांना आणखी तीन महिने मुदतवाढ दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र त्यांना अधिक मुदतवाढ न देता त्यांच्यावर राज्य सरकारने त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात महत्वाची जबाबदारी दिली आहे. मेहता हे एक जुलैपासून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात आहे असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.
संजयकुमार हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे बिहारचे असून त्यांना प्रशासकीय कामांचा दीर्घ अनुभव आहे. संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अप्पर सचिव आहेत. आता ते प्रामुख्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पडतील.