वेंकटेश जाधव / कंग्राळी
कंग्राळी खुर्द येथील बाल हनुमान तालीम मंडळ आयोजित भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या सागर मोहळकरने कर्नाटक केसरी संगमेश बिराजदारला दहाव्या मिनिटाला घिस्सा डावावर चित करून प्रेक्षणीय विजय मिळविला तर रोहित पाटील कंग्राळीने महाराष्ट्र चॅम्पियन इचलकरंजीच्या अभिजित मानकरला समोरून लपेट मारून अस्मान दाखवित 15 हजारहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली.
रात्री 8.50 वा. बाल हनुमान कुस्ती मंडळाच्या पदाधिकाऱयांच्या हस्ते साळेश्वर केसरी महाराष्ट्राचा सागर मोहळकर व कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार यांच्यात प्रमुख कुस्ती लावण्यात आली. सहाव्या मिनिटाला संगमेश बिराजदारने टाच मारून एकलांगी भरण्याचा प्रयत्न करीत सागरला खाली घेतले. पण सागरने चलाखीने सुटका करून घेतली. 10 व्या मिनिटाला सागरने एकेरी पट काढून संगमेशला खाली घेतले व घिश्शावर चीत केले.
दुसऱया क्रमांकाच्या कुस्तीत बाल हनुमान तालीम कंग्राळीचा उगवता मल्ल रोहित पाटीलने महाराष्ट्र चॅम्पियन इलचकरंजीचा अभिजित मानकरला चीत केले. तिसऱया कुस्तीत बाल हनुमान तालीम मंडळाचा मल्ल कीर्तिकुमार बेनकेने पवन चिकदिनकोप्प पवन चिकनिकोप्पला एकलांगी डावावर नमवले. चौथ्या कुस्तीत कंग्राळीच्या संकल्प येळवेने नरेंद घाडगेवर पाचव्या कुस्तीत कंग्राळीच्या प्रेम जाधवने इचलकरंजीच्या रणजित पाटीलवर मात केली.
बाल हनुमान तालीम कंग्राळीच्या मल्लांमध्ये मेंढय़ाची कुस्ती लावण्यात आल्या. प्रेम जाधवने इचलकरंजीच्या रणजितला आतिल टांगेवर तर ओमने कोल्हापूरच्या अजय सुर्यवंशीचा एकलांगी डावावर पराभव केला. किसन चौगुले कोल्हापूरने सुभाष शिंदेवर आखडी डावावर विजय मिळवून तिन्ही मल्ल्लांनी मेंढय़ाचे बक्षीस पटकाविले. त्याचप्रमाणे दर्शन पाटील, बबन पावशे, अंबरिश गुलबर्गा, सागर रेंडाळे, शुभम पाटील, अमित चौगुले, निरंजन येळ्ळूर, पृथ्वीराज पाटील, दयानंद मठपती, भिमा काटे, रामशिव यादव, निखिल कंग्राळी, राजु शिनोळी, ओमकार सांवगांव, परशराम चलवेनट्टी, उत्कर्ष बोडकेनहट्टी, प्रथमेश कंग्राळी, भय्या कंग्राळी, रोहित कडोली, कुमार पाटील, विष्णू गुरव किणये, कुमार रामदुर्ग आदी मल्लांनी नेत्रदीपक विजय मिळविले. अन्य कुस्त्या वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आल्या.
महिला कुस्तीलाही प्राधान्य देण्यासाठी महिला कुस्तीचे आयोजनही करण्यात आले होते. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत कंग्राळीच्या ऐश्वर्याने कडोलीच्या स्वातीचा पराभव केला. तनुजा वि. सोनी कंग्राळी ही तिसऱया क्रमांकाची कुस्ती बरोबरीत राहिली. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत लक्ष्मी बस्तवाड हिने कल्याणी कंग्राळीचा, गोकाकच्या अमुल्याने भक्ती कंग्राळीचा, गौतमी कंग्राळीने साक्षीचा पराभव केला. या महिला मल्लांना प्रोत्साहित करण्यासाठी गावातील जि. पं. सदस्या, नवनिर्वाचित महिला सदस्यांनी उपस्थिती लावली होती.
मैदानात आखाडय़ाचे पूजन कल्लाप्पा काशिराम पाटील, आर्मीचा कल्लाप्पा नरसू पावशे यांच्या हस्ते करण्यात आले. आखाडय़ाचे उद्घाटन सौंदर्य पेंटचे संचालक आर. आय. पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. हनुमान प्रतिमेचे पूजन पंडित पाटील यांच्या हस्ते, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभीची कुस्ती सुधीर गजानन पाटील, दीपक गजानन पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. देणगीदार व ज्ये÷ पैलवानांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले.
मैदान यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष अनंत निलजकर, अध्यक्ष ऑलिंपिकपटू एम. आर. पाटील. उपाध्यक्ष कृष्णा पाटील, सचिन दिनेश मुतगेकर, उपसचिव प्रकाश पाटील, खजिनदार गजानन पाटील, वाय. आर. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कुस्तीसाठी पंच म्हणून एम. आर. पाटील, कृष्णा पाटील, कल्लाप्पा पाटील, विश्वनाथ पाटील, बाळाराम पाटील, भावकू पाटील, राम पवार, हणमंत गुरव, विलास घाडी, गंगाराम बाळेकुंद्री, प्रशांत पाटील यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन जी. वाय. पाटील यांनी केले.
पुनम शिवणगेकर यांचा सत्कार
कंग्राळी खुर्द येथील मल्ल पूनम संजय शिवणगेकरची बेळगावमधील पहिली महिला एनआयएस प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल तिचा खास सत्कार करण्यात आला. तिला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी ग्रा. पं. अध्यक्षा रूक्मिणी निलजकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय कुस्ती मैदानाचे औचित्य साधून कंग्राळी गावचे नवनिर्वाचित अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्षा ज्योती पाटील आदी सर्व सभासदांचा भगवा फेटा, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.