प्रतिनिधी / चंदगड
कुदेमनी (ता. बेळगाव) येथील साहित्य संमेलनास महाराष्ट्रातून असंख्य साहित्यप्रेमी उपस्थित राहणार आहेत. हिम्मत असेल तर कर्नाटकच्या पोलिसांनी आम्हाला अडवावे, असा इशारा चंदगड तालुक्मयातील साहित्यप्रेमी ऍड. संतोष मळवीकर यांनी दिला आहे.
सीमाभागात साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठीचा जागर केला जातो. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय सीमा भागात मराठी संमेलने होतात. दरवषी नामवंत लेखक सीमाभागातील संमेलनाला हजेरी लावून वाचन चळवळ वाढीसाठी योगदान देतात. यंदा कर्नाटक सरकारने संमेलनास परवानगी नाकारुन मराठीचा आवाज घोटण्याचा प्रकार केला आहे. तो कदापी सहन करणार नाही. महाराष्ट्रातून साहित्यप्रेमी कुदेमनीत दाखल होतील. कुणीही आडवे येऊ नये, आडवे येणाऱयांची गय केली जाणार नसल्याचेही ऍड. मळवीकर म्हणाले.
देशात कुठेही राहण्याचा आणि आपली भाषा संस्कृती जपण्याचा अधिकार सर्वांना घटनेनेच दिला आहे. विशेषतः सर्वत्र अल्पसंख्याकांचा सन्मान केला जातो. मात्र कर्नाटकात अल्पसंख्यांक असलेल्या मराठी भाषिक जनतेवर सातत्याने अन्याय सुरु आहेत. बेळगाव शहरात प्रदर्शित होणारा झी टॉकीजचा ‘धुरळा’ चित्रपटही प्रदर्शित होऊ दिला गेला नाही. आता संम्मेलनात व्यत्यय आणून मराठी बांधवांचा आवाज बंद पाडण्याचा कर्नाटकी डाव आम्ही उलथवून टाकू, असेही ते म्हणाले.