सरमळे पेडणे येथील घटना, दोघा संशयितांना अटक, वाहनाचेही नुकसान
प्रतिनिधी /पेडणे
मुंबई येथील अबकारी विभागाच्या दोन अधिकाऱयांच्या पथकाला सरमळे पेडणे येथे मारहाण करण्यात आली. ही घटना घडली. या प्रकरणी संशयित म्हणून विकी साळगावकर व श्रीकृष्ण कुडव (दोघेही रा. सरमळे पेडणे) यांना पेडणे पोलिसांनी अटक केली आहे.
पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा मुंबई येथील अबकारी विभागाचे दोन उपनिरीक्षक, एक चालक व अन्य एक असे चार जण सरमळे येथे रात्री स्विफ्ट मारुती गाडीने आले. सदर अबकारी अधिकाऱयांनी स्थानिक पोलीस स्थानक तसेच पेडणे अबकारी कार्यालयाला या संबंधी कल्पना न देताच ते सरमळे येथे शुभम बारच्या आसपास घिरटय़ा घालू लागले. यावेळी तेथील युवकांनी संबंधित कारचा नंबर आपल्या मोबाईल सदर गाडी कोणाची आहे हे तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र तो गाडी क्रमांक चुकीचा असल्याचे कळले. त्यामुळे तेथील स्थानिक युवकांनी या गाडीतील चालकाला तुम्ही कोणाला शोधत आहेत, असा जाब विचारला. त्यावेळी त्या युवक व त्या अबकारी अधिकाऱयांमध्ये भांडण झाले. यामध्ये अधिकाऱयांना मारहाण करण्यात आली. यावेळी त्या स्थानिक युवकांना हे महाराष्ट्रातील अबकारी अधिकारी आहेत की कोण आहेत, याबाबत काहीच कल्पना नव्हती. या मारहाणीत मुंबई येथील अबकारी विभागाचे प्रवीण कांबळी व रवींद्र राणे हे दोन उपनिरीक्षक जखमी झाले. तसेच एम .एच. 07 ए.व्ही 7899 या स्विफ्ट कारचेही नुकसान केले.
दरम्यान, त्या अधिकाऱयांनी मारहाणीची तक्रार दाखल केल्यानंतर दुपारी सरमळे पेडणे येथील विकी साळगावकर व श्रीकृष्ण कुडव या दोघांना या प्रकरणी संशयित म्हणून पेडणे पोलिसांनी कलम 143, 147, 341, 332, 333, 323 352, 427 व आयपीएस 149 खाली गुन्हा नोंद करून अटक केली.
नजीकच्या अबकारी, पोलीस स्थानकाला माहिती का दिली नाही
सरमळे पेडणे येथे रात्री उशिरा मुंबईहून अबकारी खात्याचे दोन अधिकारी व एक चालक व अन्य एक मिळून चारजण सरमळे येथे येतात आणि बार मालकाच्या घराशेजारी घिरटय़ा घालतात. यासंबंधी स्थानिकांनी जाब विचारल्यावर उलट उत्तरे देतात तसेच आपली सुरुवातीला कोणतीही ओळख देत नाहीत. यावरून हे अधिकारी का आले होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गाडीचा नंबर बोगस.?
अबकारी अधिकारी हे सरकारी नोकर असतात. त्यांनी जी गाडी आणली त्या गाडीवर एम .एच.07 ए. व्ही 7899 असा क्रमांक खास काळय़ा मार्कने लिहिलेला आढळला. हा क्रमांक बोगस असल्याचे कळले.
गाडीत होत्या लोखंडी सळय़ा
अबकारी अधिकारी हे दारुची माहिती घेण्यासाठी आले होते, अशी माहिती मिळाली. त्याच्या अधिकाऱयांकडे तसा लेखी आदेश होता अशी माहिती मिळाली. जर ते माहिती घेण्यासाठी आले होते तर त्यांनी सुरुवातीलाच आपली ओळख का दाखविली नाही. त्यांनी आपल्या गाडीत लोखंडी सळय़ा का आणल्या, असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला असून याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
दरम्यान, भांडणात जखमी झालेले दोन्ही अधिकाऱयांना दुपारी इस्पितळातून डिस्चार्ज दिल्याची माहिती पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.