ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. कोरोनाविरोधात लढणाऱ्या यंत्रणेत देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव होत आहे. आता राज्याच्या कोरोना टास्क फोर्समध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.
कोरोनाबाबतच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या मुंबईतील फोर्टिस रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉ. संजय ओक यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तत्काळ मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांना ऑक्सिजन सपोर्ट दिल्यानंतर आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. लवकरच त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.