ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत काहीशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात एकूण 9 हजार 558 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर मंगळवारी ही संख्या 8,418 इतकी होती. तसेच काल नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही घटली आहे. कालच्या दिवशी 8,899 इतके रुग्ण बरे झाले आहेत. तर मंगळवारी 10,548 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. तसेच, मृत्यूची संख्येत घट झाली असून बुधवारी 147 रुग्णांनी प्राण गमावेल आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण 58 लाख 81 हजार 167 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.5% टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,31,24,800 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 22 हजार 831 (14.62%) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,34,423 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,645 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 14 हजार 62 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.