गोमेकॉचे डिन शिवानंद बांदेकर यांची सरकारला सूचना
प्रतिनिधी / पणजी
गोव्याशेजारील महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातून गोवा राज्यात प्रवेश करणाऱया प्रवाशांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करावी, अशी सूचना गोमेकॉचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सरकारला केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की गोव्यात आता कोरोनाचे प्रमाण बरेच कमी झाले असून ते मर्यादीत आणि नियंत्रणात आले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रवासी- लोक गोव्यात आले तर गोव्यातील कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे, म्हणून गोव्यात काळजी घेण्याची गरज त्यांनी वर्तवली आहे.
ते म्हणाले की कोरोनाचा नवा अवतार हा जास्त संसर्गिक आहे. म्हणजे त्याचा संसर्ग वेगाने पसरतो आणि तो वाढतो असे दिसून आले आहे. त्याने मृत्यू होत नाही पण तो कोरोना मोठय़ा संख्येने रुग्ण वाढवू शकतो. म्हणून सर्वांनी सावध रहाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कोरोना लसीकरण यशस्वीपणे चालू
गोव्यात कोरोनाचे लसीकरण यशस्वीपणे चालू असून त्यांचे कोणतेही वाईट परिणाम दिसून येत नाहीत. कोरोनाची दुसरी लाट आली तरी त्यास तोंड देण्यास आम्ही समर्थ आहोत. अनेक डॉक्टर्स, नर्स- आरोग्य कर्मचारी यांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती डॉ. बांदेकर यांनी दिली.
गर्भाशयाबाहेर गर्भधारणेची दुर्मीळ प्रसुती गोमेकॉत यशस्वी
गर्भाशयाबाहेर गर्भधारणा होऊन तो वाढण्याचे एक प्रकरण गोमेकॉतील प्रसुती विभागाने यशस्वीपणे सोडवले असून डॉक्टरांच्या एका पथकाने शस्त्रक्रिया करुन त्या महिलेची सुटका केली. वाळपई येथील 25 वर्षीय महिला पोटात दुखते अशी तक्रार घेऊन आल्यानंतर तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. अडिच महिने कालावधीचा गर्भ गर्भाशयाबाहेर वाढला होता, असा प्रकार अपवादात्मकपणे आढळतो असे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.