ऑनलाईन टीम / मुंबई :
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. खबरदारी म्हणून भारतासह जगातील अनेक देशांनी ब्रिटन बरोबरची हवाई सेवा स्थगित केली आहे.
दरम्यान आता महाराष्ट्रातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टि्वट करुन या बद्दल माहिती दिली आहे.
ते म्हणाले, ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.
दरम्यान, वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले.
ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येते मात्र. गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की, इतर राज्यातील विमानतळांवर उतरून प्रवाशी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या-त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावे, असेही त्यांनी नमूद केले.