मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमणाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट संक्रमित एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे.
राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पहिला डेल्टा होता त्यानंतर डेल्टा प्लस आला, डेल्टाने त्याचे रुप बदललंय का? याच्याबाबत सध्या बारकाईनं अभ्यास सुरू आहे. ३७ जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला १०० नमुने घेतले आहेत. त्यांची ट्रॅवल हिस्ट्री, त्यांनी लसीकरण केले होते का? हे तपासलं जात आहे. केंद्राकडूनही मदत घेत आहोत.
महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या व्यक्तीचं वय ८० असून ते अन्य आजारानेही देखील पीडित असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. घाबरण्याचं कारण नाही. केंद्रासोबत मिळून आम्ही यावर तपास करत आहोत असं देखील त्यांनी यावेळी सांगितले.