कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत नारायण यांची माहिती, करवीर निवासिनी अंबाबाईचे घेतले दर्शन
प्रतिनिधी / कोल्हापूर
देशात महाराष्ट्र, तामिळनाडू राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी कर्नाटकच्या सीमेवर स्बॅब तपासणी सुरू आहे. साथ नियंत्रणात आल्यानंतर हे नियम शिथील केले जातील, अशी ग्वाही कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत नारायण यांनी दिली.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत नारायण यांनी शुक्रवारी सकाळी शिर्डी येथील साईबाबा मंदिराला भेट दिली. दुपारी ते कोल्हापुरात आले. त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला भेट देऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत कन्नड अभिनेता सुपरस्टार राजकुमार यांचे सुपुत्र पुनीत राजकुमार, डॉ. विजय व्हरांबळे, संतोष आनंददास व भाविक वेणु गोपाल उपस्थित होते. उपमुख्यमंत्री डॉ. नारायण यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर मातृलिंग मंदिर, महाकाली आणि सरस्वती देवीचे दर्शन घेतले. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री डॉ. नारायण म्हणाले, आपण अंबाबाईचे भक्त आहोत. त्यामुळे या जगन्मातेचा आशीर्वाद सर्वांवर असावा, कोरोनापासून तिने सर्वांचे रक्षण करावे, असे साकडे घातले आहे. कर्नाटकच्या सीमेवर कोरोना प्रतिबंधासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत. महाराष्ट्र आणि तामिळनाडूत सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत. ही साथ नियंत्रणात येईपर्यत कर्नाटकच्या सीमेवर वाहनांची तपासणी सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री जारकीहोळी राजीनामा प्रकरण कायदा व सुव्यवस्थेशी निगडीत आहे. त्यामुळे त्यांच्या अहवालानंतर यावर बोलू, असेही त्यांनी सांगितले.