ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 264 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर तीन जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 11 हजार 392 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 121 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 11,392 पोलिसांमध्ये 1179 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि 10,213 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यात 2 हजार 084 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 9 हजार 187 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 911 पोलीस अधिकारी आणि 8276 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 11 पोलीस ऑफिसर आणि 101 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.