ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यात परतीचा पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाचे पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.
मुंबईसह कोकणात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र सॅटेलाईट आणि रडारने टिपलेल्या नव्या चित्रांनतर मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी प्रशासनासह नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.
दरम्यान, मुंबईसह उपनगरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. जोरदार पावसानंतर शहरातील सखल भागात पाणी भरले होते. परळ, हिंदमाता, भायखळा, सायन किंग्ज सर्कल या परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. काही ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात अनेकांचे नुकसान झाले आहे.
- पुण्यात रात्रभर पावसाचा कहर ; सकाळी विश्रांती
पुण्यात काल दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळ नंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी भरल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. चंदन नगर, सहकार नगर, दगडूशेठ मंदिराजवळील शिवाजी रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये तर पाणी भरले. शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, रात्रभर पावसाने झोडपून काढल्यानंतर सकाळी मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र अजूनही काही भागात अजूनही पाणी साचलेले आहे. काही भागातील रस्ते अजूनही जलमय आहेत.