कर्नाटक-महाराष्ट्र सरहद्दीवर उभारले तपासणी नाके : घाबरुन न जाण्याचे आवाहन
वार्ताहर / उचगाव
केरळ पाठोपाठ महाराष्ट्रातही एव्हियन इन्फ्लुएंझा अर्थात बर्ड फ्लूचा संसर्ग आढळल्याने बेळगाव जिल्हा प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. जिल्हा पंचायत व पशुसंगोपन खात्याच्यावतीने खबरदारीची सूचना म्हणून बेळगाव शहराच्या दिशेने प्रवेश करणाऱया कर्नाटक-महाराष्ट्र सरहद्दीवर तपासणी नाके उभारले आहेत.
शेजारील राज्यातून येणाऱया पोल्ट्री वाहनांची तपासणी करूनच त्यांना आता बेळगाव भागात प्रवेश दिला जाणार आहे.
जिल्हा पंचायत व पशुसंगोपन खात्याने बेळगाव शहरामध्ये येणाऱया सर्व प्रवेश हद्दीमध्ये तपासणी नाके उभारले आहेत. बेळगाव आणि महाराष्ट्र सरहद्दीवरील भागात सध्या पोल्ट्री उद्योग मोठय़ा प्रमाणात चालतो. या पोल्ट्री फार्ममधून बळगाव जिल्हय़ात बर्ड फ्लूची बाधा होऊ नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे.
अवहाल निगेटिव्ह आला तरच प्रवेश
परराज्यातून येणाऱया पक्षी व पोल्ट्रीसंबंधी सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. तपासणी अहवाल निगेटिव्ह आला तरच वाहनांना बेळगाव शहरात प्रवेश मिळणार आहे.
हिंडलगा येथील चेकपोस्ट नाक्यावरील तपासणी केंद्रावर डॉ. विनय संग्रोळी, डॉ. प्रताप हन्नुरकर, डॉ. शशीधर कळकेरी, डॉ. एम. के. जाधव यांची नियुक्ती केली असून त्यांच्याकडून सर्व तपासण्या केल्या जात आहेत. सध्या बेळगाव भागात बर्ड फ्लूचा संशयित पक्षीही अद्याप आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. उगीचच भीती पसरविली जाऊ नये. अंडी सेवनासह चिकन खाण्यात कोणतीच बाधा नाही. कोणीही न घाबरता खबरदारी घेऊन चिकन, अंडी खाल्यास बाधा होणार नसल्याचा निर्वाळाही डॉक्टर्स मंडळींकडून देण्यात येत आहे.