- 66 हजार 358 नवे रुग्ण; 895 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरी देखील रुग्ण संख्या आणि मृत्यूची संख्येत वाढ सुरु आहे. अशातच महाराष्ट्रातून सलग दुसऱ्या दिवशी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
मागील 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मंगळवारी राज्यातील तब्बल 67,752 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. असे असले तरी काल 66 हजार 358 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. सोमवारी हिच संख्या 48 हजार 700 इतकी होती. सोमवारच्या तुलनेत काल मोठी वाढ झाली असून हा फरक 17 हजार 658 इतका आहे. कालच्या दिवशी 895 जणांनी आपला जीव गमावला आहे. मृतांची वाढती संख्या भीतीदायक आहे.
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 44 लाख 10 हजार 085 वर पोहचली आहे. यातील 36 लाख 69 हजार 548 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 66 हजार 179 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.21 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.5 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 72 हजार 434 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 कोटी 62 लाख 54 हजार 737 नमुन्यांपैकी 16.80 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 42 लाख 64 हजार 936 क्वारंटाईनमध्ये असून, 30 हजार 146 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- मुंबई : 8,240 रूग्णांना डिस्चार्ज
मुंबईतून देखील थोडी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील 24 तासात तब्बल 8,240 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 4,014 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर कालच्या दिवशी 59 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 5,55,101 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 66,045 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.