ऑनलाईन टीम / पुणे :
सलग 10 महिन्यांपासून एकही वीजबिल न भरणाऱ्या पुणे परिमंडलातील 79 हजार 916 लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी राज्यात सर्वाधिक प्रतिसाद देत गेल्या दोन आठवड्यांत थकबाकीपोटी 113 कोटी 22 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
वाढत्या थकबाकीमुळे महावितरणवरील आर्थिक संकट अधिकच गडद झाल्यामुळे इतर थकबाकीदारांसोबतच प्रामुख्याने1 एप्रिल 2020 पासून वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई महावितरणला सुरु करावी लागली. मात्र वीजपुरवठा खंडित होण्यापूर्वीच या ग्राहकांनी महावितरणची आर्थिक अडचण लक्षात घेत वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करण्यास सुरवात केली आहे. राज्यात देखील सलग 10 महिने वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून 5 लाख 74 हजार 410 लघुदाब ग्राहकांनी वीजबिल थकबाकीच्या 749 कोटी रुपयांचा भरणा केला आहे.
पुणे परिमंडलात जानेवारी 2021 पर्यंत सलग गेली 10 महिने वीजबिल न भरणाऱ्या लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांची एकूण संख्या 3 लाख 99 हजार 128 होती आणि त्यांच्याकडे एकूण 526 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी होती. यात घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक 3 लाख 31 हजार 87 तर थकबाकी देखील 320 कोटी 36 लाख रुपये होती. मात्र महावितरणच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत या ग्राहकांनी गेल्या 1 फेब्रुवारीपासून वीजबिलांची थकबाकी भरण्यास सुरवात केली आहे.
गेल्या दोन आठवड्यांत राज्यात सर्वाधिक प्रतिसाद देत पुणे परिमंडलातील 79 हजार 916 थकबाकीदारांनी 113 कोटी 22 लाख रुपयांचा भरणा केला आहे. एप्रिल 2020 नंतर प्रथमच या ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा केला आहे. यामध्ये घरगुती 54 हजार 348 ग्राहकांनी 37 कोटी 39 लाख, वाणिज्यिक 22 हजार 818 ग्राहकांनी 51 कोटी 54 लाख आणि औद्योगिक 2750 ग्राहकांनी 24 कोटी 29 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 55 हजार 170 थकबाकीदारांनी 81 कोटी 70 लाख तर हवेली ग्रामीण, मुळशी, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर, मावळ व खेड तालुक्यातील 24 हजार 746 थकबाकीदारांनी 1 कोटी 52 लाख रुपयांचा भरणा केला आहे. तर गेल्या आठवड्याभरात 4922 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.