ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 1233 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आता 16 हजार 758 वर पोहचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 651 एवढी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरून याबाबातची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 3094 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मागील 2 दिवसात 700 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 1 लाख 99 हजार 897 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 73 हजार 838 जणांचे नमुने निगेटिव्ह आले. तर 16 हजार 858 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत 10 हजारांचा टप्पा पार
बुधवारी मुंबईत 769 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 10 हजारांपार पोहचला आहे. मुंबईत आतापर्यंत 10 हजार 714 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 412 जण दगावले आहेत.