ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 1602 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 27 हजारांपार गेली आहे. राज्यात आतापर्यंत 27 हजार 524 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1019 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी राज्यात 44 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईत 25, नवी मुंबई 10, पुण्यात 5, औरंगाबाद 2, पनवेल आणि डोंबिवलीमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. काल दिवसभरात 512 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 6059 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 लाख 40 हजार 145 नमुन्यांपैकी 2 लाख 12 हजार 621 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 27 हजार 524 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 15 हजार 686 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 15 हजार 465 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.