ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनी स्वतः यासंदर्भात ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे म्हटले आहे.
याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे त्यांची सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.