4 ते 9 एप्रिल अखेर रंगणार कुस्तीचा थरार : कार्यकारणी बैठकीत शिक्कामोर्तब
फिरोज मुलाणी / औंध :
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत मल्ल आणि कुस्तीशौकिन यांची ताणलेली उत्कंठा आज संपुष्टात आली. स्व. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रामध्ये पार पडलेल्या कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारणी बैठकीत यंदाची 64 वी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारला घेण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 4 ते 9 एप्रिल अखेर श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे स्पर्धा होणार आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्यातील सर्वोच्च किताबाची स्पर्धा आहे. विविध वजनगटात राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा होत असली तरी तमाम कुस्ती शौकिनांचे लक्ष खुल्या गटातील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या लढतीकडे असते. दरवर्षी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मात्र कोरोना महामारीमुळे 2020 साली स्पर्धा झाली नाही. यंदा स्पर्धेसाठी जिल्हानिहाय निवड चाचणीचे सोपस्कार पार पडले होते. मात्र कोरोना नंतर ओमायक्राँनचे संकट उभे राहिल्याने पुन्हा स्पर्धा लांबणीवर गेली होती. आता कोरोनाचे संकट दूर झाल्याने शासनाने लावलेले निर्बंध देखील
शिथिल झाले आहेत. स्पर्धा घेण्यासाठी सर्वच स्तरातून मागणी होत होती. मल्ल आणि कुस्तीशौकिनां यांना देखील स्पर्धेची उत्कंठा लागली होती.
आज पुणे येथे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सर्जेराव शिंदे,गणेश कोहळे, हनुमंत गावडे , संभाजी वरूटे, दयानंद भक्त, सुरेश पाटिल , तांत्रिक सचिव बंकट यादव, सुनील चौधरी, वामनराव गाते , भरत मेकाले , मुर्लीधर टेकुलवार, संपत साळुंखे, शिवाजी धुमाळ, सुभाष घासे, सुभाष ढोणे, विनायक गाढवे, ललित लांडगे यांच्या उपस्थितीत
झालेल्या बैठकीत स्पर्धेच्या कार्यक्रम निश्चित करण्यात आला. सातारा जिल्हा क्रीडा संकुल येथे 4 एप्रिल ते 9एप्रिल अखेर स्पर्धा होणार आहे. अँमेनोराचे अनिरुध्द देशपांडे स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.ज्युनियर व सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी मारुती सावजी लांडगे कुस्ती हॉल भोसरी (पिंपरी चिंचवड) येथे १८मार्च ते २० मार्च अखेर होणार आहे. मल्लांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा येथे आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे, स्पर्धा समन्वयक महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, शेखर शिंदे, प्रा. दिलीप पवार, नवनाथ ढमाळ, तानाजी निकाळजे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
जिल्ह्याला 60 वर्षानी बहुमान मिळाला
सातारला कुस्तीची मोठी परंपरा आहे. आँलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा वारसा लाभलेल्या जिल्ह्यात यंदा महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होत आहे ही जिल्ह्यातील कुस्तीशौकिनाच्या द्रुष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. 1962 साली सातारला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली होती त्यानंतर तब्बल 60 वर्षानंतर पुन्हा सातारा जिल्ह्याला यजमान पदाचा बहुमान मिळाला आहे.
कुस्तीक्षेत्रात “तरुण भारतची”च चर्चा
कुस्तीच्या आखाड्यात दै.तरुण भारतने नेहमीच पैलवानांच्या हिताची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हावी यासाठी सातत्याने सडेतोडपणे लिखाण केले होते. यंदाची मानाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारला होणार हे तरुण भारतचे आजचे व्रुत तंतोतंत खरे ठरले. आज अनेकांनी तरुण भारत कार्यालयात दुरध्वनी करून याबाबत खात्री केली. दिवसभर कुस्तीशौकिनांच्या मध्ये तरुण भारतच्या बातमीचीच चर्चा होती. स्पर्धा होणार हे निश्चित होताच तरुण भारतवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
पवारांची सातारला पसंती
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्यावी यासाठी अनेकांनी परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना साकडे घातले होते. परिषदेच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून स्पर्धा आयोजन करण्यासाठी खा.पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. आँलम्पिकवीर खाशाबांच्या जिल्ह्यात यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यासाठी त्यांनी सातारला पसंती दिली.