कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत होणार घोषणा; कुस्ती शौकिनांच्या नजरा स्पर्धेच्या तारखेकडे
गजानन लव्हटे / सांगरूळ
महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मुहूर्त गुरुवारी ठरणार आहे .महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक गुरुवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी होणार असून यावेळी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख व ठिकाण ठरणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना दिली आहे.
कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी १९५३ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली .कुस्ती टिकावी येथील मातीतून चांगले मल्ल तयार होऊन ते देश-विदेशात देखील चमकावे या उद्देशाने स्थापन झालेल्या परिषदेच्या अंतर्गत गेली सहा-सात दशकापासून राज्यातील सर्वोच्च अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे नेटके आयोजन करून त्या यशस्वीपणे पार पाडल्या जातात.
महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात चैतन्य निर्माण करणारी ही स्पर्धा दरवर्षी डिसेंबर महिन्यात होत असते . कोरोना मारीमुळे गेली दोन वर्षे या स्पर्धा झालेल्या नाहीत .यामुळे महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्लांचे मोठे नुकसान झाले आहे . २०२० व २०२१ या दोन वर्षी स्पर्धा न झाल्यामुळे दोन मल्लांना महाराष्ट्र केसरी किताबाला मुकावे लागले . यामुळे या स्पर्धा व्हाव्यात यासाठी संपूर्ण कुस्ती क्षेत्रातून जोरदार मागणी होत होती .आता या कुस्ती स्पर्धा होण्याचे संकेत मिळत असल्याने पैलवानांच्या व वस्तादमंडळी बरोबरच संपूर्ण कुस्ती क्षेत्राच्या नजरा कुस्तीगीर परिषदेच्या या निर्णयाकडे लागल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते शरदराव पवार , सचिव प्रा .बाळासाहेब लांडगे , वरिष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्यालयीन सचिव ललित लांडगे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे मुख्य समन्वयक हिंदकेसरी पै अमोल बुचडे, सिटी ग्रुप चे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्यात आज महाराष्ट्र केसरी व इतर वजन गटातील स्पर्धेची प्रेक्षकांसहित आयोजना बाबतची चर्चा झाली आहे.
महाराष्ट्र शासनाचे कोविड बद्दलच्या बदलेल्या धोरणाचे आदेश अभ्यासून , महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे ठिकाण व स्पर्धेची नियोजित तारीख दिनांक १० मार्च रोजी होणाऱ्या परिषदेच्या .कार्यकारणी सभेत निश्चित करण्यात येणार आहे . कोविड परिस्थितील महाराष्ट्र राज्यातील तमाम पैलवान हितचिंतक व कुस्ती शौकीन यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आभार व्यक्त केले आहे.
कुस्तीक्षेत्रासाठी स्पर्धा आवश्यक
महाराष्ट्र केसरी सह विविध गटात होणाऱ्या स्पर्धेमुळे पैलवानांचे समोर निश्चित असे टारगेट राहते .यामुळे पैलवान स्वताला झोकून देऊन जिद्द आणि चिकाटीने तालमीत व्यायाम करत असतो . यामुळे सर्वच गटातील पैलवानांची तयारी चांगली होते.नियमित सराव आणि खुराक याच्या जोरावरच कुस्ती क्षेत्रातले यश अवलंबून आहे .यामुळे महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धा होणे ही महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे .- पै अस्लम काझी [ छत्रपती शिवराय आखाडा कुर्डूवाडी ]