कुस्ती शौकीनांना प्रतिक्षा. मल्ल आणि प्रशिक्षक यांच्यात संभ्रम
फिरोज मुलाणी/ औंध
मानाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अगदी तोंडावर आली आहे. अद्यापतरी दोन्ही गटांकडून दावे प्रतिदावे सुरुच आहेत. स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर होत नसल्याने महाराष्ट्र केसरी कुस्ती आखाडय़ावरील संभ्रमाचे ढग कायम आहेत.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही राज्याच्या कुस्ती क्षेत्रात सर्वोच्च किताबाची स्पर्धा आहे. अजिंक्यपद पदाचा मान मिळवण्यासाठी या स्पर्धेत अतिशय चुरशीच्या लढतीचा थरार रंगतो. त्यामुळे या स्पर्धेकडे राज्यातील तमाम कुस्ती शौकीनांचे डोळे लागलेले असतात. यंदा मात्र स्पर्धा आयोजनाबाबत मैदानाबाहेर वेगळाच आखाडा रंगला आहे. आयोजनासाठी दोन गटात सुरू असलेल्या डाव प्रतिडाव यामुळे यजमान पदाच्या लढतीची चुरस वाढली आहे. दोन्ही गटाकडून आयोजनाचे दावे केले जात असले तरी स्पर्धा आयोजनाचे मैदान कोण मारणार याबाबत कुस्ती शौकीनांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बरखास्त करून परिषदेचा कारभार पाहण्यासाठी अस्थायी समितीची स्थापना केली आहे. कुस्ती महासंघाच्या कारवाई बाबत तत्कालीन परिषदेच्या कार्यकारणी सदस्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले होते. अस्थाई समितीच्या माध्यमातून आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी कार्यक्रम पार पडला आहे.अस्थाई समितीने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याच्या तयारीला वेग आला असतानाच. न्यायालयाच्या निकालानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनासाठी आखाडय़ात उडी घेतली आहे.पुण्यात झालेल्या कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारणी बैठकीत अहमदनगरला स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले. मुंबईत गुरुवारी 8 डिसेंबर रोजी परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि कार्यकारणी सदस्य यांच्या उपस्थित आ. संग्राम जगताप यांना स्पर्धेच्या आयोजनाचे पत्र देण्यात आले होते.
कुस्तीगीर परिषदेने स्पर्धा आयोजनात आघाडी घेतली असताना कुस्ती संघटनेतील एका गटाने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. ब्रिज भूषण सिंह यांची दिल्लीत भेट घेतली. अस्थाई समितीचे माध्यमातून पुण्यात 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचे खा. ब्रिज भूषण यांनी जाहीर केले. तसेच माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना आयोजनाचे पत्र देखील दिले आहे. आयोजकांनी स्पर्धेची तारीख आणि ठिकाण जाहीर करावे असे पत्रात म्हटले आहे. दोन्ही गटांनी स्पर्धा आयोजनाबाबत आखाडय़ाबाहेर ताकद लावली आहे. आयोजनासाठी आखाडय़ात नाटय़मय घडामोडी होत आहेत. दोन्ही गटाकडून स्पर्धा आयोजनाचा दावा केला जात असला तरी स्पर्धेची तारीख आणि कार्यक्रम निश्चितपणे जाहीर करण्यात आला नसल्याने मल्ल आणि प्रशिक्षक यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यात 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचे जाहीर केले आहे. स्पर्धा आयोजनाबाबत आयोजक मुरलीधर मोहोळ यांचेशी भ्रमणध्वनी वर संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.
वेट अन्ड वॉच
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरला घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने आम्हाला पत्र दिले आहे. स्पर्धा आयोजनाची सर्वोतोपरी आमची तयारी आहे. परिषदेने आम्हाला स्पर्धेचा कार्यक्रम दिल्यानंतर आम्ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडू. परिषदेने कार्यक्रम निश्चित करेपर्यंत वेट ऍन्ड ची भूमिका राहिल.
आमदार संग्राम जगताप