वार्ताहर/ औंध
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आता फक्त मल्ल, कुस्तीशौकिन आणि वस्ताद यांच्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. जिह्यात होणारी मानाची राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आता प्रशासनाने देखील शड्डू ठोकला आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व स्तरावर यंत्रणा गतिमान झाली आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारचा मानबिंदू असलेल्या छ. शाहू स्टेडियमवर रंगणार आहे. जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पर्धा आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी शेखरसिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांची बैठक घेऊन प्रशासनाला सुचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा विभाग आता प्रत्यक्ष आखाडय़ात तयारीला लागलेला आहे. स्टेडियमची स्वच्छता आणि रंगरंगोटी आदी कामे सध्या युध्दपातळीवर सुरू आहेत. ही स्पर्धा गादी आणि माती विभागात दहा गटात होईल. राज्यातील विविध 31 जिल्हे आणि महापालिका यांचे अंदाजे 45 संघ स्पर्धेतील अंदाजे 900 मल्ल, पंच, प्रशिक्षक सहभागी होणार आहेत. मैदानाची आखणी करून मँटचे तीन आणि मातीचे दोन आखाडे उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
खेळांडूसाठी, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, आदी सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता पार्किंग व्यवस्था, बंदोबस्त आदी बाबींवर भर देण्यात येत आहे. स्पर्धा पाहण्यासाठी जिह्यातून आणि राज्यभरातून कुस्ती शौकिन हजेरी लावणार आहेत. स्टेडियमवर त्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धा पार पाडण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात येणार आहेत. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी पालकमंत्री यांचे आदेशानुसार जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग सज्ज झाले आहेत.
लौकिकास साजेशी स्पर्धा पार पाडू
जिह्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे याचा क्रीडा विभागाला आनंद आहे. सातारला कुस्तीचा दैदिप्यमान वारसा आहे. स्पर्धेच्या निमित्ताने जिह्यात येणारे मल्ल, प्रशिक्षक यांना सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. सर्वांच्या सहकार्याने जिह्याच्या लौकिकास साजेशी स्पर्धा यशस्वी करु.
युवराज नाईक
जिल्हाक्रीडाधिकारी सातारा