प्रतिनिधी/ सातारा
दोन वर्षानंतर झालेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विशाल बनकरला धुळ चारत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील ने गदा पटकावली. परंतु त्याला बक्षीसाची रक्कम मिळाली नसल्याची खंत त्याने व्यक्त करताच आयोजकांची लबाडी उघड पडली. त्याच्यावर अन्याय झाल्याची बाब सातारकरांच्या निदर्शनास येताच पृथ्वीराज पाटील यास बक्षीस देण्यासाठी सातारकरांची चढाओढ सुरु झाली. खासदार उदयनराजेंच्यावतीने बुलेट देण्याचे जाहीर करण्यात आले. आमदार शिवेंद्रराजेंच्याकडून 5 लाख, सुशिलदादा मोझर यांच्या रक्षक प्रतिष्ठानकडून 1 लाख 5ख1 हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले. तसेच अनेकांनी पृथ्वीराज पाटील यांच्यावर बक्षीसांची खैरात सुरु झाली.
गेल्या पाच दिवसांपासून सातारा शहरात महाराष्ट्र केसरीचा फिव्हर सुरु होता. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अंतिम कुस्ती ही सोलापुरचा विशाल बनकर विरुद्ध कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यांच्यात झाली. पृथ्वीराज पाटील याने महाराष्ट्र केसरीची कुस्ती जिंकताच सगळीकडे जल्लोषी वातावरण झाले. परंतु आयोजकांनी त्यास बक्षीसाची रक्कम दिली नसल्याची खंत त्यांनी मीडियाजवळ रविवारी दुपारी व्यक्त केल्याने आयोजकांचा बुरखा फाटला गेला. यावेळी त्यांनी मंडियाजवळ बोलताना म्हणाला की यापूर्वीच्या महाराष्ट्र केसरींना फुल ना फुलाची पाकळी बक्षीस दिले जात होते. मला फक्त गदा आणि मानपत्र देण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केले. अशी त्याने खंत व्यक्त करताच साताऱयातून जोरदार नाराजी आयोजकांच्यावर व्यक्त करत अनेकांनी बक्षीस म्हणून पृथ्वीराज यास रक्कम जाहीर करण्याचा सपाटा सुरु झाला.
आमच्याकडून पाठपुरावा सुरु
सातारा तालिम संघाकडे काही नसते. बक्षीस कुस्तीगिर परिषदेच्यावतीने देण्यात येते. कुस्तीगिर परिषदेने दिले की नाही दिले याची मला अजून कल्पना नाही. आमच्याकडे कार्यक्रम हॅण्डल करणे, कार्यक्रमाचे नियोजन करणे, कार्यक्रम पार पाडणे, हे तालिम संघाकडे असते. बक्षीसाचे व मानधनाचे तालिम संघाकडे नाही. ते कुस्तीगिर परिषदेकडे आहे. कुस्तीगिर परिषद आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात काय झाले हे मला माहिती नाही. त्याला बक्षीस मिळवण्यासाठी पाठपुरावा करु. नियम आहे त्यानुसार आमचे प्रयत्न राहतील असे आयोजक म्हणून दीपक पवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे ट्विटद्वारे मदतीची माहिती
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पृथ्वीराज पाटील यास बक्षीस न दिल्याची माहिती मिळताच त्यांनी लगेच कै. शिवाजीराव चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन लाख रुपये जाहीर केले. त्याची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, काल पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज पाटील यांना काही कारणामुळे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळण्यास विलंबाबाबतीत मी तात्काळ दखल घेऊन कै शिवाजीराव चँरीटेबल ट्रस्टच्या वतीने दोन लाखाचा धनादेश आजच पृथ्वीराज पाटील यांच्या मूळगावी रवाना केला आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री.छ. प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघाकडून महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना मिळणार बुलेट
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेता पृथ्वीराज पाटील यांना श्री.छ. प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघाकडून बुलेट ही दुचाकी सप्रेम देण्यात येणार असल्याची माहिती तालीम संघाचे उपाध्यक्ष तथा माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनिल काटकर यांनी दिली.
महाराष्ट्राची अस्मिता असलेला कुस्ती हा पारंपारिक खेळ. मातीमधील या खेळाचे अप्रुप संपूर्ण जगाला आहे. याच कुस्तीमधील मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा सातार्यात पार पडली. या स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील व मुंबईचा विशाल बनकर यांच्यात चुरशीचा अंतीम सामना झाला. या सामन्यात पृथ्वीराज पाटील याने बनकर याच्यावर पाच-चार ने मात करीत हा सामना जिंकला. त्यामुळे श्री.छ. प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघ, सातारा कडून महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना बुलेट देण्यात येणार आहे. ही बुलेट खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती श्री.छ. प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघाचे उपाध्यक्ष तथा माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनिल काटकर यांनी दिली.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यास बलवंत फाउंडेशनकडून बक्षीस
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील तसेच उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर व महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गुणवंत सर्वच प्रमुख मल्लांचा बलवंत फाउंडेशनतर्फे बलवंत पाटील, सचिन शिंगाडे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करून त्यांना सन्मानपूर्वक बक्षीस धनादेश देण्यात आले. बलवंत फाऊंडेशनच्या सातारा येथील कार्यालयात हे सत्कार करण्यात आले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने सातायात आलेल्या काही प्रमुख मल्लांची निवास व भोजन व्यवस्था फाउंडेशनतर्फे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विजेत्या महाराष्ट्र केसरीसह उपमहाराष्ट्र केसरी व बलवंत फाउंडेशनमध्ये निवासासाठी असलेल्या व विविध वजनी गटांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या मल्लांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व बक्षीसी धनादेश देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये माऊली जमदाडे, सिकंदर शेख, सागर सूळ, राजेंद्रनाना सूळ, सागर चौगुले, तुषार ठोंबरे, कालीचरण सोलनकर, वैभव रासकर प्रमुख मल्लांचा समावेश होता. विविध क्षेत्रातील गुणीजनांचा गुणगौरव करणे व त्यांना प्रोत्साहन देणे हे बलवंत फाऊंडेशनचे प्रमुख धोरण आहे. तसेच कुस्तीच्या या प्रांतात उल्लेखनीय कामगिरी करणारे व नवभरारी घेणायांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असे बळवंत पाटील यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. दरम्यान, या सत्काराबद्दल महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनगर, माऊली जमदाडे, सिकंदर शेख आदींनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच स्पर्धेच्या कालावधीमध्ये निवास ,भोजन आदींबाबत बलवंत फाउंडेशनने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जयंत लंगडे यांनी सूत्रसंचालन, तर सचिन शिंगाडे यांनी आभार मानले.
रक्षक प्रतिष्ठानकडून 1 लाख 51 हजारांचे बक्षीस
साताऱयात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेता पृथ्वीराज पाटील यास आयोजकांकडून योग्य बक्षीस न दिल्याचे समजताच रक्षक प्रतिष्ठानचे सुशिलदादा मोझर यांनी व्हिडीओद्वारे पृथ्वीराज यास 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. लवकरच ही रक्कम रक्षक प्रतिष्ठान पृथ्वीराज पाटील यास सन्मानपूर्वक स्वाधीन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.